मनपाचे ई- टेंडर एनआयसीला
By Admin | Published: June 5, 2016 11:43 PM2016-06-05T23:43:26+5:302016-06-05T23:55:26+5:30
औरंगाबाद : महापालिकेने ई-टेंडर सेवेचे दहा वर्षांपूर्वी बीओटी तत्त्वावर खाजगीकरण केले होते. बीओटीच्या कंत्राटदाराचा कालावधी समाप्त होताच मनपाने संपूर्ण सेवा स्वत: चालविण्यासाठी घेतली
औरंगाबाद : महापालिकेने ई-टेंडर सेवेचे दहा वर्षांपूर्वी बीओटी तत्त्वावर खाजगीकरण केले होते. बीओटीच्या कंत्राटदाराचा कालावधी समाप्त होताच मनपाने संपूर्ण सेवा स्वत: चालविण्यासाठी घेतली असून, शासनाच्या एनआयसी (नॅशनल इनफर्मेशन सेंटर) सोबत कनेक्ट करण्यात येत आहे. त्यामुळे ई-टेंडरमध्ये घोटाळे करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांच्या मक्तेदारीला चांगलाच लगाम लागणार आहे.
महापालिकेत पूर्वी कोणत्याही विकासकामांच्या निविदा एका डब्यात जमा करण्यात येत होत्या. या प्रक्रियेमुळे कंत्राटदारांमध्ये उघडपणे रिंग होत होती. काही कंत्राटदारांना निविदा दाखल करण्यास मज्जावही करण्यात येत होता. निविदांमध्ये होणारा घोळ बंद व्हावा म्हणून दहा वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त असीमकुमार गुप्ता यांनी ई-टेंडर प्रक्रिया आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला. पुण्याच्या वंश इन्फोटेक या संस्थेला दहा वर्षांसाठी ई-टेंडर यंत्रणा चालविण्याचे काम बीओटी तत्त्वावर देण्यात आले होते. एक टेंडर विकल्यावर संस्थेला ३०० रुपये देण्यात येत होते. संस्थेसोबतचा करार संपुष्टात आल्यावर मनपाने वंश इन्फोटेकचे काम थांबविले. संस्थेकडील सर्व संगणकीय साहित्य मनपाने आपल्या ताब्यात घेतले आहे. आता मनपा स्वत: ई-टेंडरची यंत्रणा सांभाळणार आहे. आॅनलाईन टेंडरची प्रक्रिया शासनाच्या एनआयसीसोबत कनेक्ट करण्यात येत असून, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांनाही आता मनपाची कामे मिळविता येतील. मागील चार दिवसांपासून या नवीन यंत्रणेची चाचणी घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ई-टेंडरमध्ये मनपाचे अधिकारी कोणाला काम द्यायचे किंवा नाही याचा निर्णय परस्पर घेत असत. कारण एकाच कंत्राटदाराची निविदा उघडायची आणि दुसऱ्यांची तांत्रिक कारणांमुळे उघडायची नाही. ही सर्व दुकानदारी आता बंद होणार आहे.
नवीन सेवेचे फायदे
पूर्वी मनपाचे कंत्राट खरेदी करण्यासाठी कंत्राटदारांना पैसे खर्च करावे लागत होते. आता नवीन यंत्रणेत मोफत टेंडर डाऊनलोड करून घेता येईल.
ज्या कंत्राटदाराला टेंडर भरल्यानंतरही दरामुळे काम न मिळाल्यास अनामत रक्कम आपोआप आपल्या बँक खात्यात जमा होईल. एनआयसीसोबत मनपाचे ई-टेंडर सर्व्हर कनेक्ट झाल्यावर राष्ट्रीय व राज्यस्तरीय कंत्राटदारही कामे घेण्यासाठी येतील. कंत्राटदारांमध्ये जास्त स्पर्धा झाल्यास मनपाचा आर्थिक फायदा होईल. पूर्वी ई-टेंडर विभागाची सूत्रे मनपाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांकडे होती. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी ही सूत्रे मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांच्याकडे सोपविली आहेत.