तडीपारांचा पेठबीड भागात खुलेआम वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:08 AM2017-10-23T01:08:56+5:302017-10-23T01:08:56+5:30
शहरातील पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून तडीपार केलेले आरोपी खुलेआम वावरत असल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून तडीपार केलेले आरोपी खुलेआम वावरत असल्याचे समोर आले आहे. याकडे पोलीस निरीक्षकांची डोळेझाक होत आहे. हाच धागा पकडून पेठबीड पोलिसांच्या नाकावर टिच्चून स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकाने चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पेठबीड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून अनिलकुमार जाधव रूजू झाल्यापासून गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. महिला व मुलींची छेडछाड, चो-या, दरोडे, खून, गोळीबार आदी घटना या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. याचा तपास लावण्यात पेठबीड पोलिसांना यश आले नाही. त्यांच्या या निष्क्रीयतेमुळे पेठबीड भागात गुन्हेगारी वाढली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
दरम्यान, गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी जिल्ह्यात गुंड, कुख्यात, सराईत गुन्हेगारांविरोधात कडक कारवायांचा बडगा उगारला. मोका, तडीपार, एमपीडीएसारख्या कारवाया केल्या. तडीपार केलेल्या आरोपींच्या संख्या आतापर्यंत २० च्या पुढे गेली आहे. परंतु तडीपार केल्यानंतर काही आरोपी जिल्ह्यात येऊन पुन्हा खुलेआम वावरत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे तडीपार केल्यानंतर त्यांच्या घराची व इतर ठिकाणची वारंवार माहिती घेणे संबंधित पोलीस ठाण्याचे काम आहे.
परंतु पेठबीड पोलीस ठाणे याला अपवाद आहे. हे सर्व करण्यास येथील पोलीस उदासिन आहेत. त्यामुळेच तडीपार केलेले आरोपी खुलेआम पेठबीड भागात फिरत आहेत. पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव यांच्याशी वारंवार संपर्क केला, परंतु त्यांनी याला प्रतिसाद दिला नाही. म्हणून त्यांची बाजू समजू शकली नाही.