वडगाव-बजाजनगरच्या वसाहतींत सुविधा मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 09:32 PM2019-06-27T21:32:40+5:302019-06-27T21:33:52+5:30
वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या खाजगी गटनंबरीमधील अनेक वसाहतींत नागरी सुविधा मिळत नसल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे.
वाळूज महानगर : वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या खाजगी गटनंबरीमधील अनेक वसाहतींत नागरी सुविधा मिळत नसल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. या वसाहतींतील दूषित पाणी पुरवठा व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या परिसरात सुविधा पुरविण्याऐवजी सिडको व ग्रामपंचायत प्रशासन टोलवा-टोलवी करीत असल्याचा नागरिकांतून केला जात आहे.
सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणाºया वडगाव कोल्हाटी परिसरातील गट नंबर ४८ मध्ये विकासकाने भूखंड विकसित करुन घरे व फ्लॅट नागरिकांना विकले. या परिसरातील मिराजगावेनगरी, बालाजीनगरी, साई विहार, साईप्रसाद अपार्टमेंट, सारा व्यंकटेश या नागरी वसाहतींत मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या वसाहतीत महिनाभरापासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
या भागात सिडकोकडून आठ दिवसांआड पाणी पुरवठा केला जात असून, तोही दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सिडकोची पाणी पुरवठ्याच्या जलवाहिनी गेलेल्या ठिकाणी सांडपाणी व केर-कचरा साचल्यामुळे हेच दूषित पाणी नळाला येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सिडकोकडून पाणीपट्टी सक्तीने वसुली केली जात असून, सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. या वसाहतीत वर्षभरापासून घंटागाडी फिरकत नसल्यामुळे ठिक-ठिकाणी कचरा साचत आहे. या कचºयापासून दुर्गंधी पसरत असल्यामुळे नागरिक कचºयाची विल्हेवाट लावत आहे.