महापालिका, पोलीस व्यवस्थेचे वाभाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:20 AM2017-09-07T01:20:34+5:302017-09-07T01:20:34+5:30
यंदा विसर्जन मिरवणुकीत महापालिकेने काहीच नियोजन केले नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव होय. गणेशोत्सवानिमित्त खड्ड्यांची डागडुजी करण्यासह विसर्जन मिरवणुकीत भक्तांना सोयीसुविधा देण्याचे काम महापालिकेचे आहे. मात्र, यंदा विसर्जन मिरवणुकीत महापालिकेने काहीच नियोजन केले नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. मुख्य विसर्जन मार्गावर विद्युत व्यवस्थेचा अभाव, जागोजागी मोबाइल टॉयलेट नाहीत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. सर्वात कहर म्हणजे गुलमंडी येथे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने लाखो गणेशभक्तांना दुर्गंधीमुळे प्रचंड यातना सहन कराव्या लागत होत्या.
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच मनपाच्या पदाधिकाºयांनी खड्ड्यांची डागडुजी करा, असे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर आजारी पडले. त्यामुळे विसर्जनाच्या तयारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. महापौरही ९ सप्टेंबर रोजी होणाºया महापौर परिषदेच्या तयारीनिमित्त व्यस्त झाले. महापालिकेच्या विद्युत विभागाने मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर शंभर टक्के विद्युत व्यवस्था केल्याचा दावा केला. प्रत्यक्षात हा दावा मंगळवारी रात्री फोल ठरला. गुलमंडी, पैठणगेट, सिटीचौक, रंगारगल्ली अनेक भागात अंधाराचे साम्राज्य पसरलेले होते. या भागातील सर्व पथदिवेही बंद ठेवण्यात आले होते. दरवर्षी मनपातर्फे ठिकठिकाणी मोबाइल टॉयलेट, गणेश भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येते. यंदा अशी व्यवस्था दिसून आली नाही. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये महापालिकेच्या विरोधात संतापाची लाट पसरली होती.