पुस्तकी ज्ञान नको, व्यावसायिकता जोपासणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:05 AM2021-03-20T04:05:17+5:302021-03-20T04:05:17+5:30
पामू श्रीनिवासा : तंत्रशिक्षण गुणवत्ता सुधार कार्यक्रम ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद औरंगाबाद : केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता राष्ट्रीय, ...
पामू श्रीनिवासा : तंत्रशिक्षण गुणवत्ता सुधार कार्यक्रम ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद
औरंगाबाद : केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांत सहभागी व्हावे, तेव्हाच कुशल विद्युत अभियंता तयार होऊ शकतो, असे मत केरळच्या नॅशनल पाॅवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे संचालक पामू श्रीनिवासा यांनी व्यक्त केले.
तंत्रशिक्षण क्षेत्रातील विद्वान व्यक्ती, अभियंते, वैज्ञानिक आणि संशोधक यांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्या ज्ञान आणि कौशल्याची देवाण- घेवाण घडवून आणण्याच्या उद्देशाने शासकीय अभियांत्रिकी तसेच उज्जैन अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १९ व २० मार्च असे दोनदिवसीय ‘इलेक्ट्रिकल सिस्टिम अँड टेक्नोलॉजी’ या विषयावरील ‘आयसेट २०२१’ या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेची सुरुवात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारपासून झाली.
केंद्र सरकारच्या तंत्रशिक्षण गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत (टेक्वीप) ही परिषद होत आहे. उद्घाटन कार्यक्रमास पामू श्रीनिवासा यांच्यासह ‘टेक्वीप’चे राज्याचे नोडल अधिकारी डॉ. अनिल नांदगावकर, डॉ. सुनील पंजाबी, प्राचार्य पी. बी. मुरनाल, संयोजन समितीचे डॉ. एन. आर. भस्मे, प्रा. एस. एस. धामसे, डॉ. एस. एम. शिंदे आदींची उपस्थिती होती. यावेळी औरंगाबादमधील पर्यटनस्थळांवर आधारित तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली.
केरळच्या नॅशनल पाॅवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने आतापर्यंत तीन लाखांच्या जवळपास विद्युत अभियंत्यांना प्रशिक्षित केले आहे. येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला उत्कृष्ट अभियंते तयार करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन यावेळी श्रीनिवासा यांनी दिले.
पहिल्या सत्रात ‘ऊर्जा संक्रमण आणि तंत्रज्ञान अभिसरण’ या विषयावर वर्ल्ड विंड एनर्जी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. जामी होसेन यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी अनुक्रमे डॉ. विनोद खडकीकर व डॉ. एस. एम. शिंदे होते.
चौकट...
जगभरातून प्रतिसाद
या परिषदेत पहिल्या दिवशी जगभरातून ४० शोधनिबंध सादर करण्यात आले. उद्या शनिवारी एक्स्पर्ट ग्लोबल सोल्युशन्सचे संचालक मुकुंद कुलकर्णी हे ‘उद्योगाभिमुख शैक्षणिक धोरण आणि जागतिक अपेक्षेनुसार संशोधन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ‘कंट्रोल सिस्टिम डिझाईन फॉर मिसाईल अँड चॅलेंजेस, स्कोप’ या विषयावर हैदराबादच्या संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचे संचालक आणि हवाई संरक्षण कार्यक्रमाचे सल्लागार डॉ. एन. व्ही. कदम हे मार्गदर्शन करणार आहेत.