कमिशनसाठी गटसचिवाची शेतकरी दाम्पत्यास अर्वाच्य शिवीगाळ,घरात घुसून जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 12:20 PM2023-04-12T12:20:32+5:302023-04-12T12:33:52+5:30
अंधारी येथील घटना : घरात घुसून जिवे मारण्याची दिली धमकी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
आळंद (छत्रपती संभाजीनगर) : सोसायटीचे कर्ज मंजूर करण्याच्या बदल्यात पैसे देण्यास नकार देणाऱ्या शेतकरी दाम्पत्यास जातवा (ता. फुलंब्री) येथील सोसायटीच्या गटसचिवाने सोमवारी (दि.१०) अंधारी येथे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे सगळीकडे संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी गटसचिव बाळू किसन वानखेडे विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, जातवा येथील साहेबराव बाजीराव पवार व अलकाबाई साहेबराव पवार हे शेतकरी दाम्पत्य बँकेच्या कामासाठी सोमवारी (दि.१०) अंधारी (ता. सिल्लोड) येथील बँकेत गेले होते. तेव्हा गटसचिव बाळू किसन वानखेडे हा तेथे आला व ‘मी तुमचे सोसायटीचे कर्ज मंजूर केले असून, त्याबदल्यात मला तुम्ही ३ हजार रुपये द्या, असे म्हणत साहेबराव पवार यांच्या हातातून बँकेचे खातेपुस्तक हिसकावून घेतले व ते फाडले. याचा जाब अलकाबाईंनी विचारल्यानंतर अर्वाच्य व अश्लील भाषेत शिवीगाळ करीत घरात घुसून मारेल, अशी धमकी दिली.
यावेळी काही ग्रामस्थांनी वानखेडे यास समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने कोणाचेही ऐकले नाही. यानंतर गरीब असलेले शेतकरी दाम्पत्य हताश होऊन तेथून निघून गेले. वानखेडे याच्या भीतीपोटी त्यांनी तक्रार दिली नाही. मात्र, याबाबत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे संताप व्यक्त होऊ लागला. यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी अलकाबाई साहेबराव पवार यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गटसचिव बाळू वानखेडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जातवा सोसायटीचा गटसचिव बाळू वानखेडे हा शेतकऱ्यांना सोसायटीच्या कर्ज प्रकरणात नेहमी पैशांची मागणी करीत छळतो. याबाबत तक्रार करूनही त्याची मुजोरी सुरूच आहे. त्याने शेतकरी पवार दाम्पत्यास केलेली शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याने ते दहशतीखाली आहेत. बाळू वानखेडेच निलंबन व त्याच्यावर कारवाई न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल.
-रवी तान्हाजी पवार, सामाजिक कार्यकर्ते, जातवा