रात्री १० नंतरही बीअर बारमध्ये बिनधास्त चिअर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:02 AM2021-01-21T04:02:11+5:302021-01-21T04:02:11+5:30
बापू सोळुंके औरंगाबाद: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आला आहे. रात्री १० वाजता हॉटेल, बीअर बार ...
बापू सोळुंके
औरंगाबाद: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आला आहे. रात्री १० वाजता हॉटेल, बीअर बार आणि दारु दुकाने बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश धाब्यावर बसवून शहरात मध्यरात्रीपर्यंत हॉटेल, बार सुरू ठेवले जात असल्याचे लोकमतने मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजेपासून १२ वाजेपर्यंत केलेल्या रिॲलिटी चेकमधून समोर आले.
कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारने नियम आणि अटी घालून हॉटेल, बीअर बार उघडण्यास परवानगी दिली आहे. रात्री १० वाजता हॉटेल, बार, वाईन शॉप, देशी, विदेशी दारू दुकाने बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांचे स्पष्ट निर्देश आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होते अथवा नाही याची ‘लोकमत’ने मंगळवारी पडताळणी केली. या पडताळणीत जयभवानीनगर चौकातील वाईन आणि बीअर शॉपी रात्री १०:२० वाजता चालू असल्याचे दिसले. दुकानासमोर काही ग्राहक उभे होते. या दुकानाशेजारील बीअर बार उघडे असल्यामुळे ग्राहक आत बाहेर ये जा करीत होते. पुंडलिकनगर रस्त्यावरील सरकारमान्य देशी दारु दुकान आणि हनुमान चौकातील बीअर शॉपी मात्र १० वाजता बंद होती. पुंडलिकनगर येथील उत्तर आणि दक्षिण बाजूचे बारचे दार खुले होते.
सेव्हन हिल येथील बार आणि हॉटेलमध्ये रात्री १०:४० वाजता ग्राहकांना प्रवेश दिला जात होता. या परिसरातील दोन्ही हॉटेलच्या बाहेर ग्राहकांनी आणलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गारखेडा येथील हॉटेल रात्री ११ वाजता सुरू असल्याचे पाहून गस्तीवरील पोलिसांनी त्यांचे वाहन थांबवून हॉटेल बंद करण्याच्या सूचना दिल्या. याच हॉटेल समोरील सूतगिरणी चौक ते गारखेडा रस्त्यावरील बारचे दार उघडे होते. विश्वभारती कॉलनीतील हॉटेल बीअर बार रात्री ११:३० वाजता सुरू असल्याचे दिसून आले.
-======================
पोलिसांना मिळतात पाण्याच्या बाटल्या
गस्तीवरील पोलिसांचे वाहन बीअर बार समोर येऊन थांबताच हॉटेलमधील कर्मचारी पाण्याच्या एक किंवा दोन बाटल्या आणून पोलिसांना देतो. आम्ही परत येइपर्यंत हॉटेल बंद झाले पाहिजे असे सांगून पोलीस पुढे निघून जातात.
===================
कोट
बार,मद्य विक्रीची दुकाने रात्री १० वाजता बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश आहेत. या आदेशानुसार सरकारमान्य देशी, विदेशी दारु दुकाने आणि बार यांनी वेळेचे बंधन पाळणे बंधनकारक आहे.
=सुधाकर कदम, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग
======================
औरंगाबाद जिल्ह्यातील दारू दुकाने
बीअर बार आणि परमिट रुम - ५५०
देशी दारूची दुकाने- १२८
वाईन शॉप -३२
बीअर शॉपी -१४०