ना तासिका, ना शिक्षकांच्या नियुक्त्या; तरीही ७७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त प्रवेश

By राम शिनगारे | Published: July 29, 2024 01:16 PM2024-07-29T13:16:28+5:302024-07-29T13:24:04+5:30

शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या कारवाईकडे लक्ष; छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरातील अनुदानित महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची वानवा, ग्रामीणमध्ये दुप्पट प्रवेश

No classes, no teacher appointments; Yet additional admissions in 77 junior colleges in rural areas of Chhatrapati Sambhajinagar | ना तासिका, ना शिक्षकांच्या नियुक्त्या; तरीही ७७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त प्रवेश

ना तासिका, ना शिक्षकांच्या नियुक्त्या; तरीही ७७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त प्रवेश

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा लागत असतानाच ग्रामीण भागातील तब्बल ७७ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देण्यात आले आहेत. या महाविद्यालयांमध्ये नियमित तासिका होत नाहीत. त्याठिकाणी शिक्षकांची नियुक्ती नसून, भौतिक सुविधाही उपलब्ध नाहीत. त्यामुळे नियमबाह्यपणे प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर शिक्षण उपसंचालक कार्यालय कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरातील नामांकित अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी अकरावी प्रवेश न घेता ग्रामीण भागातील महाविद्यालयांना प्राधान्य देत असल्याचे उघडकीस आले होते. त्यानुसार कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या संघटनेने शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांची भेट घेत हा गंभीर मुद्दा असल्याचे सांगितले. शहरातील महाविद्यालयात विद्यार्थी संख्या नसल्यामुळे संचमान्यतेमध्ये अनेक शिक्षकांची पदसंख्या कमी होत असल्याकडेही लक्ष वेधले होते. साबळे यांनी त्यांच्या अंतर्गत चारही जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक शाळांच्या तपासणीचा निर्णय घेतला.

८ ते १५ जुलैदरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४३४ महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली. या तपासणीचे अहवाल येण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार शहराच्या हद्दीजवळील ५ आणि ग्रामीण भागातील ७२ अशा ७७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देण्यात आल्याचे दिसले. फक्त अकरावीच्या नव्हे तर बारावीच्या वर्गातही अतिरिक्त प्रवेश दिले आहेत. ज्या महाविद्यालयांमध्ये भौतिक सुविधा पूर्णपणे आहेत, त्या ठिकाणी एकूण मान्यतेच्या १० टक्के प्रवेश देता येतात. मात्र, ७७ पैकी एकाही महाविद्यालयाने अतिरिक्त प्रवेश देताना परवानगी घेतली नाही.

८०, १२० च्या जागी दुप्पट प्रवेश
अकरावी, बारावीच्या वर्गात अनेक महाविद्यालयांमध्ये ८० किंवा १२० च्या तुकडीची मान्यता आहे. भाैतिक सुविधा असल्यानंतर नियमानुसार १० टक्के अतिरिक्त प्रवेश देता येतात. त्यासही उपसंचालक कार्यालयाची मान्यता घ्यावी लागते. मात्र, महाविद्यालयाच्या प्रशासनाने कोणाचीही परवानगी न घेता काही ठिकाणी दुप्पट प्रवेश दिले आहेत. आता या महाविद्यालयांवर कोणती कारवाई होते, याकडे संबंधित वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अतिरिक्त प्रवेश देणाऱ्यांना नोटीस
उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी, बारावीमध्ये देण्यात आलेल्या प्रवेशाची तपासणी केली आहे. त्याविषयीचे अहवाल प्राप्त होत आहेत. अतिरिक्त प्रवेश देणाऱ्यांना नोटीस पाठवून खुलासा मागविण्यात येईल. त्यानंतर कडक कारवाई होईल.
- अनिल साबळे, शालेय शिक्षण उपसंचालक

Web Title: No classes, no teacher appointments; Yet additional admissions in 77 junior colleges in rural areas of Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.