दुरुस्तीसाठी ठोस पाऊले नाहीत; ९०० मिमी जलवाहिनीवरील लिकेज जशास तसे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 19:39 IST2025-01-29T19:39:25+5:302025-01-29T19:39:50+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष

दुरुस्तीसाठी ठोस पाऊले नाहीत; ९०० मिमी जलवाहिनीवरील लिकेज जशास तसे!
छत्रपती संभाजीनगर : शहराला अतिरिक्त पाणी मिळावे, या हेतूने अलीकडेच टाकण्यात आलेल्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर गेवराई गावाजवळ लिकेज आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एकदा लिकेज बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी झाला. पाण्याच्या गळतीमुळे मुख्य रस्त्यावर चिखलच चिखल झाला आहे. लिकेज बंद करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल अधिकारी उचलायला तयार नाहीत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत शहराला अतिरिक्त पाणी मिळावे म्हणून युद्धपातळीवर ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. जलवाहिनीतून दररोज ७५ एमएलडी पाणी फारोळा येथे अपेक्षित आहे. मागील सहा महिन्यांपासून १० ते १२ एमएलडी पाणी येत आहे. फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करण्यात १ वर्षे वाया गेले. मजिप्रा अधिकाऱ्यांचे हे मोठे अपयश आहे. जलवाहिनी उभारणीत अनेक तांत्रिक दोष आहेत. त्याचे ऑडिटही करणे गरजेचे आहे. सर्व प्रकारचे टेस्टिंग रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतरच संबंधित कंत्राटदाराला बिल अदा करायला हवे.
नागरिकांना त्रासच त्रास
१) जलवाहिनीवर अनेक ठिकाणी लहान-मोठे लिकेज आहेत. त्याकडे संबधित कंत्राटदार दुर्लक्ष करीत आहेत.
२) गेवराई येथील लिकेजसंदर्भात वारंवार संबधित अधिकाऱ्यांना नागरिकांनी सांगितल्यानंतरही लिकेज बंद करायला तयार नाहीत.
३) लिकेजमुळे मुख्य रस्त्यावर वाहने चिखलात अडकत आहेत. दुचाकी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. रात्री अंधारात चिखल दिसत नाही.