ना कपाट ना लॉकर तुटले, मोजक्याच २८ तोळे दागिन्यांच्या चोरीने पोलिसही चक्रावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 05:13 PM2021-06-14T17:13:06+5:302021-06-14T17:21:06+5:30
crime news aurangabad कपाटातील मोठ्या लॉकरच्या आत लहान लॉकरमध्ये ४० तोळे सोन्याचे दागिने, साडेतीन किलो वजनाची चांदीची भांडे व रोख साडेतीन हजार रुपये ठेवले होते.
औरंगाबाद : धावणी मोहल्ला येथील घरातून चोरट्यांनी लॉकडाऊन काळात २८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान, कपाटातील लॉकरमधून चोरट्यांनी ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांपैकी फक्त २८ तोळे दागिने चोरून नेले. मात्र, उर्वरित १२ तोळ्यांचे दागिने, साडेतीन किलो चांदीचे भांडे आणि रोकड तशीच ठेवली. दरवाजा, कपाट किंवा लॉकरही तुटलेले नाही. दुसरीकडे, तक्रारदार महिलेने या घटनेत आपला कोणावरही संशय नाही, या आशयाची तक्रार दिली. हा सारा प्रकार पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत.
झाले असे की, विजया सचिन अवस्थी (४६, रा. अक्षय गार्डन- बी, देवानगरी, संग्रामनगर) यांनी सिटीचौक ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांचे पती सचिन अवस्थी हे एका खासगी एअर कार्गो कंपनीत प्रभारी म्हणून कार्यरत असून धावणी मोहल्ला भागात त्यांचे वडिलोपार्जित दोन मजली घर आहे. खालच्या मजल्यात त्यांचे सासू-सासरे, तर वरच्या मजल्यावर त्यांची आत्या सासू- सासरे राहतात. १८ फेब्रुवारी रोजी विजया अवस्थी यांच्या समोर सासू मीनादेवी जनार्दन अवस्थी यांनी कपाटातील मोठ्या लॉकरच्या आत लहान लॉकरमध्ये ४० तोळे सोन्याचे दागिने, साडेतीन किलो वजनाची चांदीची भांडे व रोख साडेतीन हजार रुपये ठेवले होते. त्यानंतर १४ मार्च रोजी सासू- सासरे कोरोना बाधित झाल्याने त्यांना त्यांच्या मुलाने देवानगरी येथील घरी नेले व बारा दिवसांनंतर परत धावणी मोहल्ला येथील घरी नेऊन सोडले. दरम्यान, वटसावित्री अमावस्येची पूजा दुसऱ्या दिवशी असल्याने ९ जून रोजी रात्री सासू मीनादेवी अवस्थी यांनी दागिने काढण्यासाठी लॉकर उघडले तेव्हा २८ तोळ्यांचे दागिने लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही चोरी १४ ते २६ मार्च दरम्यानच्या काळात झाल्याचे विजया अवस्थी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
चोरीला गेलेले दागिने असे
चोरट्यांनी कपाटाच्या लॉकरमधून ७.५ तोळ्यांची पोत, ६.५ तोळ्यांची पोत, २.५ तोळ्यांचे मंगळसूत्र, २ तोळ्यांचे लहान मंगळसूत्र, १.७ तोळ्यांची चेन, अर्ध्या तोळ्याचे झुमके, ९ ग्रॅम वजनाचे झुमके, अर्ध्या तोळाची गिनी, अर्ध्या तोळाची कानातील बाळी, २ तोळ्यांच्या ४ अंगठ्या, ३.५ तोळ्यांचे नेकलेस असे एकूण २८ तोळ्यांचे दागिने चोरीला गेलेले आहेत.