ना गतिरोधक, ना सिग्नल; वेस ओलांडून शहरात यायची शेंद्रा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना भीती
By साहेबराव हिवराळे | Published: March 7, 2024 06:39 PM2024-03-07T18:39:29+5:302024-03-07T18:39:45+5:30
एक दिवस एक वसाहत: नवीन परिसर उंच-उंच इमारतींमुळे देखणा दिसतो. उच्चशिक्षित रहिवासी आहेत. काही सरकारी व निमसरकारी कर्मचारी, अधिकारी येथे राहतात.
छत्रपती संभाजीनगर : प्लॅटिनम, सारा, कॉपरस्टोन, सेक्टर ४१ सह जुन्नेश्वर, वरूड रोडवरील वसाहती अगदी छत्रपती संभाजीनगरच्या वेशीवरील; पण त्या आहेत शेंद्रा पंचतारांकित ग्रामपंचायतीच्या हद्दीत. भरधाव वाहणारा जालना रोड पार करताना जराशी नजर हटली तरी अपघातास सामोरे जाण्याची भीती या नागरिकांना सारखी वाटते. येथे ना स्पीड ब्रेकर ना सिग्नल. म्हणून जीव मुठीत धरूनच जालना रोड ओलांडावा लागतो. अहो, किमान सिग्नल बसवा, नाही तरी स्पीड ब्रेकर तरी टाका, या त्यांच्या किमान अपेक्षाही कोण पूर्ण करणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
नवीन परिसर उंच-उंच इमारतींमुळे देखणा दिसतो. उच्चशिक्षित रहिवासी आहेत. काही सरकारी व निमसरकारी कर्मचारी, अधिकारी येथे राहतात. रहदारीच्या ठिकाणी रस्त्यावर परवानगीने गतिरोधक उभारण्याविषयी नागरिकांंच्या शिष्टमंडळाने अनेक लोकप्रतिनिधींसमोर आपली व्यथा मांडली; परंतु अद्याप कोणीही निराकरण केलेले नाही. जालना रोड पार करण्यासाठी काही वेळ थांबल्याशिवाय नागरिकांना सुरक्षित रस्ता पार करण्याचे दिव्य लाभत नाही. दररोज ही जीवघेणी कसरत नागरिकांना करावी लागते. अंधारात तर अत्यंत गैरसोयीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागत असून, शेंद्रा ग्रामपंचायत देखील या नवीन वसाहतीकडे लक्ष देत नाही. नागरिकांनी आपल्या व्यथा मांडाव्यात तरी कुणाकडे, असा प्रश्न आहे. नळ नसल्याने बोअरवेल आणि पिण्यासाठी जारचे पाणी उपयोगात आणावे लागते. उन्हाळ्यात बोअरवेलचे पाणी आटल्याने विकतचे टँकर मागवावे लागते.
अंधारात अपघाताची भीती
दिवसा रस्ता ओलांडणे, हे धोक्याचे आहेच; पण रात्री ट्युशनहून मुली, मुले आणि कामगार येतात. त्यांना अंधारातच चालत जावे लागते. ग्रामपंचायतीने किंवा लोकप्रतिनिधीच्या निधीतून पथदिवे लावण्याची आवश्यकता आहे. याकडे लक्ष कोण देणार, असा प्रश्न आहे.
-संदीप बंड, रहिवासी
विजेचा लपंडाव
वीजपुरवठा खंडित झाल्यास तत्काळ दखल घेतली जात नाही. वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
- नामदेव कातारे, रहिवासी
रहदारीसाठी सिग्नल तर लावा...
सुरळीतपणे रस्ता ओलांडता यावा म्हणून या रस्त्यावर वाहतुकीची गती कमी व्हावी आणि गतिरोधक, वाहतूक सिग्नल बसविण्याची गरज आहे. जागतिक रस्ते विकास महामंडळाने हा प्रश्न सोडवावा.
- शिवाजी हरकळ, रहिवासी
जलवाहिनी टाका
बोअरवेलच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. अनेकदा टँकरचे पाणी विकत आणावे लागते. ग्रामपंचायतीने जलवाहिनी टाकण्याची गरज आहे.
- कन्नन अय्यर, रहिवासी
कचऱ्याचे नियोजन करा..
स्वखर्चाने प्लॅटिनम सोसायटीतील नागरिकांना कचरा उचलावा लागतो. इतरत्र ग्रामपंचायतीच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या फिरविल्या जातात. कचरा उचलण्याची सोय नसल्याने काही जण रस्त्यावर कचरा टाकत आहेत.
- ज्ञानेश्वर काकड, रहिवासी
कर लावून सेवा-सुविधा पुरवाव्यात..
ग्रामपंचायतीने घरांना कर लावून स्थानिक सेवा-सुविधा पुरवाव्यात. नागरिकांनी व बांधकाम व्यावसायिकांंनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
- शिवाजी बेलखेडे, रहिवासी