कर्जमुक्त झालेला एकही शेतकरी दिसला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 06:22 AM2019-09-01T06:22:00+5:302019-09-01T06:22:05+5:30
आदित्य ठाकरे; बेरोजगारांचा आक्रोश
औरंगाबाद : जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा मी आज पूर्ण करीत आहे. आतापर्यंत ७६ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले. राज्यात मला बेरोजगारी, शेतकऱ्यांचा आक्रोश प्रचंड असल्याचे दिसून आले. शासनाने अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली असली, तरी अद्यापपर्यंत एकही कर्जमुक्त झालेला शेतकरी मला दिसून आलेला नाही. शासनाने घेतलेल्या निर्णयानंतर यंत्रणेत कुठेतरी दोष असल्याची जाणीव होत आहे. या त्रुटी भरून काढाव्या लागतील, असे मत शनिवारी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. चार हजार किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत केला आहे. नागरिकांचे गाºहाणे ऐकून घेत आहे. लोकसभेत शिवसेनेला मतदान केल्यामुळे आभार मानत आहे. विरोधात मतदान केले असेल तर त्यांचे मन वळविण्याचा मी प्रयत्न करतोय, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली.
‘स्किल बेस इनकमिंग’
नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल आपले मत काय, या थेट प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी बगल दिली. आम्ही स्कील बेस इनकमिंगवर भर देतोय. भविष्यात पक्षाला, राज्याला ज्यांच्यापासून फायदा होईल, त्यांनाच पक्षात प्रवेश देत आहोत. आपल्याला मुख्यमंत्री बनायला आवडेल का? मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काम करायला आवडेल? यावरही त्यांनी थेट उत्तर दिले नाही. आम्ही दोघेही हिंदुत्ववादी आहोत. राज्यासाठी दोघे मिळून काम करू इच्छितो, असे ते म्हणाले.
...तरच मी निवडणूक लढणार
विधानसभा निवडणूक कोठून लढविणार यावर आदित्य म्हणाले की, वरळी, दिग्रज, मालेगाव येथून कार्यकर्त्यांची मागणी होत आहे. माझी कर्मभूमी संपूर्ण महाराष्टÑ आहे. जनतेने आदेश दिला तरच मी लढणार आहे.