हॉकर्स झोनवर निर्णय नाही; व्यापारी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:31 PM2019-05-19T23:31:14+5:302019-05-19T23:31:38+5:30
रस्त्यावर उभ्या राहणाºया हॉकर्सचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्रस्त व्यापारी महापालिका, पोलिसांना करीत आहेत.
औरंगाबाद : रमजान महिन्यातील पहिल्या दहा दिवसांचा ‘अशरा’ संपला. दुसऱ्या अशºयाला सुरुवात झाली असून, जुन्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर हातगाडी, फेरीवाले, फळ विक्रेत्यांची संख्या दहापटीने वाढली आहे. लाखो रुपये देऊन दुकाने भाड्याने घेतलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकानात जाण्यासाठीही रस्ता शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे रस्त्यावर उभ्या राहणाºया हॉकर्सचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्रस्त व्यापारी महापालिका, पोलिसांना करीत आहेत. दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवीत आहेत. मागील आठवड्यात महापालिकेत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत ठोस असा कोणताच निर्णय घेण्यात आला नाही.
रमजान महिन्याला सुरुवात होताच शहरातील प्रमुख रस्त्यांवर हातगाडीचालक, फेरीवाले, फळ विक्रेत्यांनी जागा व्यापल्या आहेत. दरवर्षीच्या या त्रासामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. शहागंज, सिटीचौक, रंगारगल्ली, गुलमंडी, टिळकपथ, औरंगपुरा आदी भागात रस्त्यावर जिथे जागा मिळेल तेथे हॉकर्स मंडळींनी बस्तान मांडले आहे.
लाखो रुपये भाडे भरून आणि कोट्यवधींचा माल ठेवून ग्राहकांची प्रतीक्षा करणाºया व्यापाºयांच्या दुकानांत जाण्यासाठीही जागा नसल्याचे चित्र आहे. रमजानमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. सिझन डोळ्यासमोर ठेवून व्यापाºयांनी बरीच तयारी केली आहे. हॉकर्स मंडळींमुळे व्यापारी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
मागीलवर्षीही व्यापाºयांनी पोलीस आयुक्तांना याविषयी साकडे घातले होते. शहागंजमध्ये हातगाड्या लावण्याच्या मुद्यावरून मागीलवर्षी राजाबाजारमध्ये ऐन रमजानपूर्वी दंगल उसळली होती. या दंगलीत दोन निष्पाप व्यक्तींना जीव गमवावा लागला होता. महापालिकेने हॉकर्स झोन तयार करून द्यावा, तात्पुरत्या स्वरूपात हातगाडीचालकांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने महापौरांना देण्यात आले होते.
महापौर दालनात बैठक घेण्यात आली. मुख्य बाजारपेठेत हातगाडी, फेरीवाले यांच्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यांना हॉकर्स झोन तयार करून द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रमजान महिन्यात शहागंज चमन ते हिंदी विद्यालयपर्यंतचा रस्ता सायंकाळी वाहतुकीला बंद करून आम्हाला द्यावा, अशी बाजू हॉकर्स प्रतिनिधींनी मांडली. काहींनी रस्त्यावर मार्किंग करावी, पट्टे मारावे, त्यापुढे हातगाड्या येणार नाही, असा पर्याय सुचविला. तासभर चर्चा होऊनही कुठलाच निर्णय होऊ शकला नाही. रमजान ईद जसजशी जवळ येत आहे, तसे व्यापाºयाच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. हॉकर्सप्रश्नी निर्णय घ्यावा, अशी रास्त मागणी व्यापाºयांची आहे.