संत एकनाथ रंगमंदिराचा कायापालट नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:30 AM2017-09-18T00:30:11+5:302017-09-18T00:30:11+5:30
संत एकनाथ नाट्यमंदिर १५ आॅगस्टपासून बंद करून त्याचा संपूर्ण कायापालट करण्याची घोषणा आता एक महिना होऊनही सत्यात उतरलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मराठी अभिनेते सुमित राघवन यांनी नाट्यगृहांच्या दुरवस्थेवरून शहर प्रशासनाचा नाकर्तेपणा सर्वांसमोर आणल्यानंतर तरी काही फरक पडेल, अशी अपेक्षा बाळगणाºया नाट्यप्रेमींचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. संत एकनाथ नाट्यमंदिर १५ आॅगस्टपासून बंद करून त्याचा संपूर्ण कायापालट करण्याची घोषणा आता एक महिना होऊनही सत्यात उतरलेली नाही.
तुटलेला रंगमंच, मोडलेल्या खुर्च्या, फाटलेल्या विंग, कचरा, कोपºयांमध्ये थुंकलेले, मेकअप रूमची दुरवस्था, दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे, अशा एक ना अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या संत एकनाथ रंगमंदिराचे हे हाल सुमित राघवनने फेसबुकवरून सर्व जगासमोर मांडले होते. या नाचक्कीमुळे खडबडून जागे झालेल्या लोकप्रतिनिधी व मनपाने नाट्यगृहाचा कायापालट करण्यासाठी आश्वासने आणि कोट्यवधी रुपयांच्या निधीचा पाऊस पाडला.
१५ आॅगस्टपासून नाट्यगृह संपूर्णपणे बंद करून आगामी काही महिन्यांमध्ये नूतनीकरण करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली होती. मात्र, आता एक महिना उलटूनही व्यवस्थापनाने यादृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नाही. म्हणजे पहिले पाढे पंच्चावन, अशी स्थिती आहे. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी व्यवस्थापकांशी संपर्क होऊ शकला नाही. नाट्यगृहात राजरोसपणे बुकिंग केली जात असून, कार्यक्रम होत आहेत.
शहरातील नाट्यविश्वाचा केंद्रबिंदू म्हणून संत एकनाथ रंगमंदिर ओळखले जाते. मागच्या तीन दशकांपासून अनेक दिग्गज कलाकार आणि गाजलेल्या व्यावसायिक नाटकांचे प्रयोग येथे झालेले आहेत. म्हणून तर सिडको येथे अधिक प्रशस्त व आधुनिक संत तुकाराम नाट्यगृह असूनही नाट्य निर्माते संत एकनाथ रंगमंदिरातच प्रयोग ठेवण्याचा आग्रह धरतात.
सुविधांअभावी मात्र अलीकडे अनेक नाट्यकर्मींनी उघड उघड टीका केली आहे. प्रशांत दामले यांनी तर स्वत: झाडू मारून प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घातले होते. शहरातील नाट्यप्रेमींनी ‘नावासाठी नाही गावासाठी’ या संकल्पनेवर आधारित गट स्थापन करून वेळोवेळी नाट्यगृहांची व्यथा मांडली. मात्र, ढिम्म प्रशासनावर याचा परिणाम झाला नाही.