वीज गेली, उकाड्याने हैराण आहात; मग महावितरणला व्हॉटस्ॲपद्वारे करा तक्रार
By साहेबराव हिवराळे | Published: April 4, 2024 11:35 AM2024-04-04T11:35:49+5:302024-04-04T11:40:02+5:30
महावितरण ही ग्राहकाभिमुख सेवा : ग्राहक हिताला प्राधान्य देणार
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्यात उकाडा नको तर ‘वीज समस्याचे समाधान हवे; मग महावितरणला व्हॉटस्ॲप’ करा. महावितरण ही ग्राहकाभिमुख सेवा देणारी कंपनी आहे. महावितरण ही ग्राहकाभिमुख सेवा देणारी कंपनी असून, ग्राहकहिताला प्राधान्य देणार असे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून वीजग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र व्हॉटस्ॲप क्रमांक देण्यात आला आहे.
आता मराठवाड्यातील ग्राहकांनी आपल्या विजेच्या समस्या थेट ८४८५८९९३९९ या व्हॉटस्ॲप क्रमांकावर पाठवाव्यात. या तक्रारी संबंधित विभागांच्या प्रमुखांना पाठवून तत्काळ निराकरण करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संंभाजीनगर शहर व ग्रामीण, जालना, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यांसाठी व्हॉटस्ॲप मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या क्रमांकावर नवीन वीजजोडणी मिळण्यात विलंब, वीज बिल दुरुस्ती, नादुरुस्त रोहित्र मिळण्यास विलंब, वीजपुरवठा खंडित तक्रारी, वीजचोरीसंबंधित माहिती, महावितरण कर्मचाऱ्यांविषयी असलेल्या तक्रारी व विजेची कामे करण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याची तक्रार तसेच महावितरणची वीजतार तुटलेली आहे, तारेला झोल किंवा तार जमिनीवर लोंबकळत आहे, फ्युज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकण उघडे किंवा तुटलेले आहे, रोहित्रांचे कुंपण उघडे आहे, खोदाईमुळे भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे, आदी स्वरूपांची माहिती, तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधित स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह व्हॉटस्ॲप मोबाइल क्रमांकावर नागरिकांना पाठविता येणार आहे.
वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशसह माहिती, तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. या क्रमांकावर नागरिकांनी कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉटस्ॲपद्वारे माहिती द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉटस्ॲप नाहीत, त्यांनी एसएमएसद्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.
व्हॉटस्ॲपद्वारेच येणार दुरुस्तीनंतरचे छायाचित्र
व्हॉटस्ॲपद्वारे प्राप्त झालेली फोटोसह तक्रार संबंधित मंडळ व विभागीय कार्यालयात पाठवून त्याप्रमाणे वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधित तक्रारदारांना व्हॉटस्ॲपद्वारेच दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येणार आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टिंगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधित तक्रारदारांना कळविण्यात येणार आहे.
- राहुल गुप्ता, सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक कार्यालय