नशेबाजांना बाभुळवाडीमध्ये ‘नो एंट्री’ !
By Admin | Published: August 20, 2016 12:36 AM2016-08-20T00:36:24+5:302016-08-20T00:55:32+5:30
संजय तिपाले , बीड ‘गाव करील ते राव करील काय?’ ही म्हण प्रसिद्ध आहे. तिचा तंतोतंत प्रत्यय तालुक्यातील बाभुळवाडीत आला आहे. तोंडाच्या कर्करोगाने एका कुटुंबाने एकुलता एक कर्ता तरुण गमावला
संजय तिपाले , बीड
‘गाव करील ते राव करील काय?’ ही म्हण प्रसिद्ध आहे. तिचा तंतोतंत प्रत्यय तालुक्यातील बाभुळवाडीत आला आहे. तोंडाच्या कर्करोगाने एका कुटुंबाने एकुलता एक कर्ता तरुण गमावला. जिवावर उठलेल्या व्यसनाला हद्दपार करण्यासाठी अख्खे गाव उभे राहिले अन् स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर नशेबाजांना गावात प्रवेश न देण्याच्या ठरावावर शिक्कामोर्तब झाले. झिंगाट होणाऱ्यांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी समितीही नेमली असून दंडही केला जाणार आहे.
सव्वाशेवर उंबरे व दीड हजार लोकसंख्येच्या बीड तालुक्यातील बाभुळवाडीने व्यसनाविरुद्ध केलेला हा उठाव सध्या चर्चेचा विषय बनला आहे. गावात दारुचे अधिकृत दुकान नाही; परंतु चोरीछुपे विक्री सुरु होती. गुटख्याचेही तेच. बंदी असताना किराणा दुकानांतही तो सहज उपलब्ध व्हायचा. त्यामुळे तरुणांपासून ते वृद्धापर्यंत साऱ्यांनाच तंबाखू, सिगारेट, विडी व गुटख्याचा चटका लागला होता. लक्ष्मण रामदास सातपुते हा ३२ वर्षाचा एकुलता एक तरुण मुखकर्करोगाने गेला. जिवावर उठलेल्या व्यसनाला कायमचे हद्दपार करण्याची संकल्पना सरपंच परमेश्वर सातपुते यांनी मांडली, ती गावानेही उचलून धरली. त्यानंतर तंबाखू, विडी, सिगारेट, गुटख्याची होळी करण्यात आली. महिलांनी उत्स्फूर्तपणे या निर्णयाचे स्वागत केले. व्यसन करणार नाही, अशी शपथही गावकऱ्यांनी घेतली. यावेळी ग्रा.पं. सदस्या हौसा सातपुते, रेखा खटाणे, शकुंतला जाधव, वंदना मोरे, चंपा मोरे, राघोजी सातपुते, मुख्याध्यापक प्रकाश आहिरे, ग्रामसेवक यू. के. साळवे, तंटामुक्ती अध्यक्ष सुदाम सातपुते हे उपस्थित होते.
व्यसने करणाऱ्यांसह घातक उत्तेजक पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी केरबा मातकर यांच्या अध्यक्षतेखाली व्यसनमुक्ती समिती गठित करण्यात आली. यात लक्ष्मण सातपुते, ज्ञानोबा सातपुते, नारायण सातपुते, गोरख भटे, रमेश जाधव, राम सातपुते, सखाराम सातपुते, बंडू सातपुते, जालिंदर सातपुते यांचा समावेश आहे.