कोरोना काळात भूखंड माफिया सुसाट; महापालिकेच्या अतिक्रमण विभागात तक्रारींचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 01:51 PM2020-07-28T13:51:56+5:302020-07-28T13:58:52+5:30
मागील पाच महिन्यांपासून अतिक्रमण हटाव विभागाची यंत्रणा एकदाही रस्त्यावर आली नाही.
औरंगाबाद : शहर कोरोना विषाणूमुळे त्रस्त असताना काही भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्लॉटिंग पाडून विक्रीही केली. मागील पाच महिन्यांमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे, तसेच अनधिकृत बांधकामे करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे मार्च ते जुलै या कालावधीत तब्बल ५८५ तक्रारी प्राप्त झाल्या. महापालिकेने एकाही तक्रारीचे निरसन केले नाही.
शेजाऱ्याच्या जागेवर बांधकाम, दुसऱ्याच्या खुल्या प्लॉटवर बांधकाम, मूळ प्लॉटपेक्षा जास्तीचे बांधकाम, अशा असंख्य तक्रारी मागील पाच महिन्यांत महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे आल्या आहेत. एप्रिल महिन्यात २२ तर मे महिन्यात २१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मागील पाच महिन्यांपासून अतिक्रमण हटाव विभागाची यंत्रणा एकदाही रस्त्यावर आली नाही. रविवारपासून बीड बायपासवर अतिक्रमणांवर कारवाई सुरू झाली.
कोविडचे काम प्राधान्याने
पाच महिन्यांपासून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोना विषाणूच्या निर्मूलनात व्यस्त आहे. नागरिकांनी अतिक्रमणे, तसेच अनधिकृत प्लॉटिंगबाबत तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने नंतर कारवाई निश्चित होणार आहे. कोविडच्या कामातून थोडीशी उसंत मिळताच अतिक्रमणे काढण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात येईल.
- रवींद्र निकम, अतिरिक्त आयुक्त मनपा.