महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेत मोफत घर नाही, कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिले
By विकास राऊत | Published: December 28, 2023 08:04 PM2023-12-28T20:04:30+5:302023-12-28T20:05:27+5:30
घरकुल योजनेसाठी कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : महापालिका राबवित असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतून एकही घर मोफत दिले जाणार नाही, असे मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले. घरकुल योजनेसाठी कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. बिल्डिंग प्लॅन सादर झाल्यानंतर तातडीने कंत्राटदाराला बांधकाम परवानगी देण्याची कार्यवाही केली जाईल, असेही प्रशासकांनी सांगितले.
घरकुल योजनेतून पडेगाव, तिसगाव, हर्सूल, सुंदरवाडी या ठिकाणी साधारणपणे ११ हजार २०० घरे बांधली जाणार आहेत. घरकुल बांधण्यासाठी पाच कंत्राटदार एजन्सींना कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात आला आहे.
मध्यंतरी घरकुल योजनेतून मोफत घरे मिळणार असल्याची अफवा सोशल मीडियात व्हायरल झाली होती. ही अफवा पसरताच मनपामध्ये विचारणा करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. यासंदर्भात प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले, प्रधानमंत्री घरकुल योजनेतून एकही घर मोफत मिळणार नाही. घरकुल योजनेसाठी अडीच लाख रुपये शासनाकडून मिळणार आहेत. त्यामुळे हे घरकुल साधारणपणे ६ ते ७ लाख रुपयांत मिळेल, असेही प्रशासकांनी स्पष्ट केले.
योजनेसाठी कंत्राटदारांनी बिल्डिंग प्लॅन तयार करून बांधकाम परवानगीसाठी नगररचना उपसंचालक कार्यालयाकडे सादर केल्यास त्यास तातडीने परवानगी दिली जाईल. बांधण्यासाठी साधारणपणे वर्षभराचा कालावधी लागेल. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांना कोणत्या भागात घरकुल पाहिजे, यासाठी अर्ज घेतले जातील. ज्या भागात घरकुलासाठी कमी अर्ज प्राप्त झाले, तेथे सरळ घरांचे वाटप केले जाईल. काही ठिकाणी जास्त अर्ज प्राप्त झाले तर सोडत काढून वाटप होईल, असेही प्रशासक म्हणाले.