हिंदू ना मुसलमान, बस किसान और नौजवान : योगेंद्र यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:28 PM2018-12-20T12:28:26+5:302018-12-20T12:31:25+5:30
लोकशाही, विविधतेतील एकता आणि विकास या स्तंभावर पहिल्यांदाच कधी नव्हे एवढा हल्ला करण्यात येत आहे.
औरंगाबाद : ‘हिंदू ना मुसलमान, बस किसान और नौजवान’ असा नारा आज येथे स्वराज इंडियाचे नेते व सुप्रसिद्ध विचारवंत योगेंद्र यादव यांनी दिला व भारताच्या स्वधर्मावर कधी नव्हे एवढा हल्ला चढविण्यात आला असून, तो परतवून लावण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यशवंत कला महाविद्यालयात रात्री ते चळवळीतील कार्यकर्ते व पत्रकारांशी बोलत होते. उद्या दि. २० डिसेंबर रोजी सायं. ५ वाजता देवगिरी महाविद्यालयात डॉ. आ. ह. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवी गौरव समारंभ योगेंद्र यादव यांच्या हस्ते होत आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला यादव यांनी शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांशी हा संवाद साधला.
यादव यांनी सांगितले की, देशावर आज आलेले हे संकट साधारण नाही. भारताच्या स्वधर्मावर मोठा हल्ला होत आहे.भारतीय गणतंत्र वाचविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. लोकशाही, विविधतेतील एकता आणि विकास या स्तंभावर पहिल्यांदाच कधी नव्हे एवढा हल्ला करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर समग्र रणनीती आखण्याची गरज निर्माण झाली आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली धर्माशी नाते सोडून आपण धर्मांधांना धुडगूस घालायला जणू वावच देत आहोत.
आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला हरवण्याची नितांत गरज आहे. हे आव्हान केवळ निवडणुकांपुरतेच मर्यादित नाही. १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांना हरवणे जसे अगत्याचे होते, तसेच आता नरेंद्र मोदी यांनाही हरवण्याची गरज आहे. मोदी यांच्या विरोधात महाआघाडी बनत आहे. पण तिच्याकडेही ध्येय, धोरण आणि कृती कार्यक्रम दिसून येत नाही. त्यांच्याकडेही कुठले स्वप्न नाही. मोदींनी निदान स्वप्न तरी दाखविले. अर्थात ही स्वप्ने खोटी होती; पण राजकारणात स्वप्ने दाखवणे गरजेचे असते, असे यादव म्हणाले.
चेहरा, चरित्र आणि विश्वास याची निवडणुकीत आवश्यकता असते. परंतु मुद्यांशिवाय या निवडणुका लढविण्याचा सत्ताधारी व विरोधी पक्षांचा इरादा दिसतो. पण सत्य, जमिनी या मुद्यांवर निवडणुका झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही ना हिंदू, ना मुसलमान, बस किसान और नौजवान हा नारा देत असल्याचे यादव यांनी जाहीर केले.
अण्णा खंदारे, प्रा. एच. एम. देसरडा, अॅड. डी. आर. शेळके, सुभाष लोमटे, के. ई. हरदास, अड. अंकुश भालेकर, प्रा. भारत शिरसाट, प्रा. प्रकाश शिरसाट, ज्ञानप्रकाश मोदाणी, अॅड. प्रकाश परांजपे, अली खान, मेजर सुखदेव बन, शेख खुर्रम, अय्युब खान यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.