गर्भपात करणाऱ्या रुग्णालयाची ना नोंदणी, ना डॉक्टरकडे सर्टीफिकेट
By Admin | Published: March 16, 2016 08:29 AM2016-03-16T08:29:14+5:302016-03-16T08:29:25+5:30
नांदेड : शहरातील खुशालसिंह नगरमध्ये बिनबोभाटपणे रुग्णांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याची बाब पुढे आली आहे़
नांदेड : शहरातील खुशालसिंह नगरमध्ये बिनबोभाटपणे रुग्णांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याची बाब पुढे आली आहे़ सोमवारी रात्री अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरकडे कोणतीही पदवी नसल्याची तसेच सदर रुग्णालयाची कुठेही नोंदणी नसल्याची धक्कादायक बाबही उघडकीस आली आहे़
सोमवारी रात्री खुशालसिंह नगरात संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलमध्ये डॉ़बालाजी मोरलवार याने अवैधरित्या एका महिलेचा गर्भपात केला़ सदर माहिती पोलिसांनी महापालिका पथकाला मिळाल्यानंतर येथे धाड टाकून रंगेहाथ डॉक्टरला पकडण्यात आले़ याप्रकरणी महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ़ मोहंमद आसीफ यांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात डॉ़मोरलवार याच्याविरूद्ध कलम ३१५, ३१८ भादंवि, मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नंसी अॅक्टमधील कलम ३, ४ आणि बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टमधील कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे़ सदर डॉक्टरास सोमवारी रात्रीच अटक करण्यात आली आहे़
दरम्यान, खुशालसिंहनगरात सुरू असलेल्या संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलची कोणतीही नोंदणी महापालिका अथवा अन्य कुठेही नव्हती़ तसेच डॉ़ मोरलवार यांच्याकडे कोणतेही वैद्यकीय शिक्षणाचे प्रमाणपत्रही नसल्याचे महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ़ मोहम्मद आसीफ यांनी सांगितले़ तेव्हा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून डॉ़ मोरलवार याचा धंदा बिनबोभाटपणे सुरू असल्याचे स्पष्ट होते़ शहरात असे किती रुग्णालये अवैधरित्या सुरू आहेत याची माहिती प्रशासनाला नसावी हेही नवलच आहे़ याचा फटका मात्र सामान्य रुग्णांना बसत आहे़ गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यान्वये स्थापित करण्यात आलेल्या सल्लागार समितीची बैठक १२ जानेवारी रोजी शहरात घेण्यात आली होती़ या समितीवर अशा प्रकारांना आळा घालण्याच्या उपाययोजना करण्याची जबाबदारी आहे़ या समितीकडून शहरातील किती रुग्णालयाला भेटी देवून गर्भलिंग तपासणी प्रतिबंधात्मक कारवाई केली़ याचीही माहिती पुढे येणे आवश्यक आहे़ (प्रतिनिधी)