हॉटेल, रेस्टॉरंटची तपासणीच नाही; वडा, समोसे पोट तर बिघडवणार नाहीत ना?
By साहेबराव हिवराळे | Published: April 21, 2023 05:17 PM2023-04-21T17:17:19+5:302023-04-21T17:17:59+5:30
लोकसंख्येच्या तुलनेत तालुक्याला प्रत्येकी एक अधिकारी असला तरी चारजणांवर अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याची अन्न सुरक्षा आठ अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असून, हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या २५ हजारांपेक्षा अधिक दुकानांची संख्या आहे. सध्या यात्रा उत्सवाची धूम सुरू असल्याने गावपातळीवर खाद्यपदार्थांची वडा पाव, समोसे, भजी विक्रीची दुकाने लावली जात आहेत. त्यांच्याकडे वापरात येणाऱ्या तेलाची गुणवत्ता (टीपीसी) किती, हे अन्न औषधी प्रशासनाने विभाग तपासण्याची गरज आहे.
आरोग्याच्या दृष्टीने ते खाद्यपदार्थ नुकसानदायी ठरू नये, यासाठी जनजागृती करीत आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटची तपासणीच नाही; असे म्हणता येत नाही, तर वडा, समोसे पोट तर बिघडवणार नाही ना, याची काळजी घेणे गरजेचे आहे. लोकसंख्येच्या तुलनेत तालुक्याला प्रत्येकी एक अधिकारी असला तरी चारजणांवर अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे. कर्मचारी, अधिकारी यांची नियुक्ती वाढविण्याची गरज आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाख
जिल्ह्याची ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असून, तालुक्याची जबाबदारी एकावर आहे. सध्या ५ जण जिल्ह्यात कार्यरत असून, तीन ते चार जणांवर अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे. प्रत्येक तालुक्यात अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकाने २५ हजार
जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंट, तसेच खाद्यपदार्थ विक्री करणारी जवळपास २५ हजारांवर दुकाने आहेत. खाद्यपदार्थाची तपासणी दर आठवड्यास साधारणपणे दोनशे ठिकाणी होते.
तपासणीसाठी केवळ पाच अधिकारी
जिल्हाभरात कार्यालयात आठ अधिकाऱ्यांची संख्या असून, केवळ पाच अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आलेली आहे. अतिरिक्त जबाबदारी तीन ते चार अधिकाऱ्यांवर आहे. ही संख्या वाढवण्याची गरज आहे.
एका अधिकाऱ्यावर हजार दुकानांचा भार
शहर व तालुक्यातील दुकानाची आकडेवारी लक्षात घेता एका अधिकाऱ्यावर हजाराच्या जवळपास दुकानाचा भार येतो. टीपीसी तपासणीचे काम अधिकारी करतात.
तपासणीशिवाय अन्न निरीक्षकांवर इतर कामांचा व्याप
अन्न निरीक्षकांना खाद्यपदार्थ तपासणीची कामे आहेतच; त्याशिवाय अधिकाऱ्यांवर कागदी पाठपुरावा देखील करावा लागतो. इतरही विचारलेली माहिती द्यावी लागते.
आरोग्याची काळजी महत्त्वाची
२५ हजारांवर दुकाने असून, त्यापैकी बहुतांश दुकानांची तपासणी करणेदेखील शक्य होत नाही. जनजागृतीवर भर दिला आहे. आपण खातो ते अन्न गुणवत्तापूर्वक आहे का, हे पाहूनच त्याचे सेवन करावे.
-अजित मैत्रे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन