'उत्पन्न नाही कर्जाचा डोंगर वाढला'; आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकरी दांपत्याने जीव सोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 05:03 PM2021-04-16T17:03:26+5:302021-04-16T17:06:25+5:30
यंदाही म्हणावे तसे उत्पन्न झाले नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे? या आर्थिक विवंचनेत ते होते.
कन्नड - उत्पन्न कमी आणि कर्जाचा बोजा वाढत असल्याने आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकरी दांपत्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना तालूक्यातील खामगाव येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. रामेश्वर जगन्नाथ गायके (३४) व त्यांची पत्नी आश्विनी ( ३०) असे मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामेश्वर जगन्नाथ गायके यांची खामगाव येथे शेती आहे. सततच्या नापिकीमूळे रामेश्वर गायके कर्जबाजारी झाले होते. त्यात यंदाही म्हणावे तसे उत्पन्न झाले नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे? या आर्थिक विवंचनेत ते होते. दरम्यान, गुरुवारी रात्री गायके दांपत्य शेतात पिकांना पाणी देण्याच्या निमित्ताने गेले होते. मात्र, ते पुन्हा घरी परतले नाही. त्यामूळे शोध घेतला असता शेतात दोघांचेही मृतदेह आढळून आले. गायके दाम्पत्याच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी औराळा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की रामेश्वर गायके यांच्यावर बँकेसह खासगी कर्ज होते. सतत नापिकीमुळे ते कर्ज बाजारी बनले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकाने दिली आहे. गायके दाम्पत्याच्या पश्चात आईवडील, भाऊ, भावजय, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी देवगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. स.पो.नि संजय अहिरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार शिवनाथ आव्हाळे पुढील तपास करत आहेत.