५१ आरोग्य केंद्रांत ना अग्निशमन यंत्रणेची तपासणी, ना विजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:02 AM2021-01-18T04:02:06+5:302021-01-18T04:02:06+5:30
औरंगाबाद : मुदतबाह्य अन् धुळ खाणारे अग्निरोधक यंत्रे... जुनाट वायरिंग... ही परिस्थिती जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत पाहायला मिळते. ...
औरंगाबाद : मुदतबाह्य अन् धुळ खाणारे अग्निरोधक यंत्रे... जुनाट वायरिंग... ही परिस्थिती जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत पाहायला मिळते. जिल्ह्यात तब्बल ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, परंतु तेथे ना अग्निशमन यंत्रणेची तपासणी होते, ना विजेची. भंडारा येथील दुर्घटनेनंतर तरी किमान प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या पर्यायाने रुग्णांच्या सुरक्षेचे बळकटीकरण करण्याची गरज आहे, परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुर्घटनेत नवजात शिशुंना प्राण गमवावे लागले. या घटनेने संपूर्ण राज्य आणि आरोग्य यंत्रणा हादरून गेली. या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचे आदेश राज्य शासनाने आदेश दिले आहेत. जिल्ह्यांतील मोठ्या रुग्णालयांत त्या संदर्भात युद्ध पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत, परंतु ग्रामीण भागांतील रुग्णांसाठी आधार ठरणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या तपासणीकडे दुर्लक्ष होत आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट यापूर्वी कधी झाले, याचे उत्तर आरोग्य यंत्रणेकडे नाही. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत मुदतबाह्य अग्निरोधक यंत्रे असल्याची कबुली आरोग्य अधिकाऱ्यांनीच दिली आहे. ही अवस्था तत्काळ दूर होण्यासाठी प्रयत्न करण्याची आहे, अन्यथा छोटीशी दुर्घटनाही रुग्णांसाठी जीवघेणी ठरू शकते.
--
जिल्ह्यातील ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे लवकरच फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करण्यात येणार आहे. केंद्रांमध्ये अग्निरोधक यंत्रे आहे. काही ठिकाणी यापूर्वी ऑडिट झाले आहे. आता सोमवारी फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करण्यासंदर्भात पत्र काढण्यात येणार आहे.
- डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी
---
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे-५१
---
तालुकानिहाय आरोग्य केंद्र
औरंगाबाद-६
कन्नड-९
गंगापूर-६
खुलताबाद-३
पैठण-७
सिल्लोड-६
फुलंब्री-५
सोयगाव-३
वैजापूर-६