गंगापूरात कोणीही जिंकले तरी होणार विक्रम; प्रशांत बंब-सतीश चव्हाण यांच्यात अटीतटीची लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 06:27 PM2024-11-13T18:27:07+5:302024-11-13T18:27:21+5:30
दोन्ही उमेदवार तगडे असून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. तसेच कार्यकर्त्यांचे नेटवर्कही चांगले असल्याने तुल्यबळ लढत होत आहे.
- जयेश निरपळ
गंगापूर :गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे आमदार प्रशांत बंब आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सतीश चव्हाण यांच्यातच प्रमुख लढत होत असून, दोन्ही उमेदवार तगडे असून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. तसेच कार्यकर्त्यांचे नेटवर्कही चांगले असल्याने तुल्यबळ लढत होत आहे. आ. बंब जिंकले तर या मतदारसंघातून चौथ्यांदा विजय मिळविणारे ते पहिले आमदार ठरतील आणि आ. चव्हाण जिंकले तर विधान परिषदेत जिंकल्यानंतर विधानसभा जिंकणारे ते पहिले आमदार ठरतील. त्यामुळे या लढतीत आ. बंब विजयी चौकार मारणार की आ. चव्हाण पहिल्यांदाच विधान परिषद सोडून विधानसभेत जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सतीश चव्हाण यांच्या जमेच्या बाजू
१. निवडणूक नियोजनात मनुष्यबळ हाताळणीचा तगडा अनुभव
२. उत्तम प्रशासक, संघटक असल्याने कार्यकर्त्यांची भक्कम फळी
३. कमी कालावधीत विकासकामे करून निवडणुकीला सामोरे गेल्यामुळे मतदारांचा विश्वास मिळवला.
४. मतदारसंघात दांडगा जनसंपर्क
५. गावोगावी असलेल्या क्रमांक दोनच्या नेतृत्वाला सोबत घेतले
उणे मुद्दे
१. बाहेरचा उमेदवार असल्याचा शिक्का
२. स्वपक्षासह आघाडीतील नेत्यांची काही प्रमाणात नाराजी
३. काही गावांत जुन्या हक्काच्या कार्यकर्त्यांची उणीव
४. स्पष्टवक्तेपणामुळे काही जण दुरावले
५. महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील नेत्याची साथ नाही.
प्रशांत बंब यांच्या जमेच्या बाजू
१. स्थानिक उमेदवार असल्याने मतदारसंघावर पकड
२. लोकांपर्यंत वैयक्तिक लाभाच्या योजना पोहोचवल्या
३. दूरदृष्टीचा आणि ‘पक्क्या’ नियोजनाचा नेता म्हणून ख्याती
४. सातत्याने विविध कार्यक्रम आणि उपक्रम यांच्या माध्यमातून संपर्क
५. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख
उणे मुद्दे
१. १५ वर्षांच्या कार्यकाळात वैयक्तिक लाभाच्या व्यतिरिक्त भरीव कामगिरी नाही.
२. निरनिराळ्या निवडणुकांच्या निमित्ताने तालुक्यातील बऱ्याच नेत्यांशी राजकीय तंटा
३. सरकारविरोधी बदलाची मानसिकता असणारा वर्ग
४. आजवर केलेली मोठी आश्वासने अपूर्ण
५. शिक्षकांचा प्रचंड रोष