मौजमजेसाठी पैसे नव्हते, नोकरी सोडून बनले बाईक चोर; ग्राहकांच्या शोधात असताना तिघे जेरबंद
By बापू सोळुंके | Published: May 27, 2023 11:00 PM2023-05-27T23:00:19+5:302023-05-27T23:01:50+5:30
गुन्हेशाखेने पकडले तीन चोरटे: सहा मोटारसायकल जप्त
छत्रपती संभाजीनगर: झटपट कमाई करण्याच्या नांदात चौघांनी नियमित कामधंदा सोडून शहरात वाहनचोरी सुरू केल्याचे पोलिस तपासात समोर आले. घाटी रुग्णालय परिसरात आणि एमजीएम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते कैदही झाले. चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी ग्राहक शोधत असताना अलगद गुन्हेशाखा पोलिसांच्या हाती लागले.
संतोष आबासाहेब कदम( ३०,रा. कवडगाव कोल्हाटी), राहुल कैलास देशमुख (२६)आणि दिलीप सुधाकर लंबे (२४, दोघे रा.बजाजनगर)अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दुचाकी चोरीला जात आहे. एमजीएम आणि घाटी रुग्णालय परिसरात दुचाकी चोरी करणारे चोरटे तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.
गुन्हेशाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ आणि कर्मचाऱ्यांचे पथक या चोरट्यांचा शोध घेत होते. तेव्हा हे मोटार सायकल चोर वडगांव कोल्हाटी भागातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले. तेव्हा चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आरोपी ग्राहकांचा शोध घेत असल्याची गुप्त खबर पथकाला मिळाली. पोलिसांनी आज २७ मे रोजी वडगाव कोल्हाटी येथील जोसेफ शाळेजवळील मैदानावर ते आल्याचे समजताच पाेलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी संतोष कदम, राहुल शमुख आणि दिलीप लंबे यांना पकडले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी मौजमजा करण्यासाठी विविध भागातून दुचाकी चोरी केल्याचे कबुल केले. मात्र ग्राहक न मिळाल्याने सहा वाहने लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी ६लाखाच्या आठ दुचाकी जप्त केल्या असून त्यांच्या अन्य एका साथीदाराचा शोध सुरू केला. उप निरीक्षक प्रविण वाघ, व पोलीस अंमलदार विजय भानुसे, विजय घुगे, नितीन देशमुख, काकासाहेब आधाने, कैलास काकड, शुभम वीर, नरेश भोंडे, ज्ञानेश्वर पवार, अश्वलिंग होनराव यांच्या पथकाने केली.
मौजमजेसाठी केल्या चोरल्या दुचाकी
आरोपी हे एमआयडीसीतील खाजगी कंपन्यामध्ये कामाला जात होते.मात्र मुख्य आरोपी कदम याने अन्य आरोपींना झटपट दुचाकी कशी चोरून दहा हजार रुपये एका वाहनामागे कमविण्याचे आमिष दाखविले. आरोपीही त्याच्या सांगण्याप्रमाणे त्याच्यासोबत दुचाकी चोरी करू लागले. आतापर्यंत चोरलेल्या आठ दुचाकी पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत.