आता करता येणार नाही आजारांचे नाटक; आरोपींच्या ३ दिवसांवरील मुक्कामाचा निर्णय समिती घेणार
By संतोष हिरेमठ | Published: October 23, 2023 10:04 AM2023-10-23T10:04:43+5:302023-10-23T10:05:28+5:30
विनाकारण आजारपणाचे नाटक करून रुग्णालयात मुक्काम ठोकणाऱ्यांवर आळा बसणार आहे.
संतोष हिरेमठ, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : कैदी किंवा आरोपी आजारपण सांगून रुग्णालयात दाखल होतात. मात्र, आता कैद्याचा मुक्काम रुग्णालयात किती दिवस राहील, हे समितीच ठरवणार आहे. त्यामुळे विनाकारण आजारपणाचे नाटक करून रुग्णालयात मुक्काम ठोकणाऱ्यांवर आळा बसणार आहे.
घाटी रुग्णालयात कारागृहातील कैद्यांसाठी मेडिसिन विभागाच्या इमारतीशेजारी वाॅर्ड क्र. १० हा विशेष वाॅर्ड आहे. या वाॅर्डात कैद्यांशिवाय इतर कोणावरही उपचार होत नाहीत. अगदी कारागृहाप्रमाणे या वाॅर्डाची रचना आहे. कैदी उपचारासाठी दाखल असेल तर येथे पोलिस कर्मचारीही तैनात असतात.
कसे दाखल?
कैद्यांना, आरोपींना प्रारंभी ओपीडीमध्ये दाखविले जाते. दाखल करण्याबाबत वरिष्ठ डाॅक्टर निर्णय घेतात. आता एखादा कैदी भरती झाल्यानंतर ३ दिवस दाखल असेल, त्यापेक्षा जास्त दिवस तो दाखल असण्याची गरज आहे की नाही, हे समिती ठरवेल.
रुग्णालयातून कैद्यांनी पळ काढल्याच्या घटना
२६ जून २०२३ : जालना कारागृहातून तपासणीसाठी घाटीत आणलेल्या गुन्हेगाराने पोलिसांना धक्का मारून हातकडीसह पळ काढला. सुरक्षारक्षक, पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. जून २०२० : दाखल झालेल्या कैद्याने पोलिसांच्या हाताला झटका देऊन हातकडीसह घाटीतून ठोकली धूम. एप्रिल २०१८ : हवालदाराला मारहाण करून दोन कैदी फरार. यातील एकाला पाठलाग करून पकडले. जुलै २०१६ : ‘एमआरआय’साठी नेताना खून प्रकरणातील संशयिताचे पलायन. २० मे २०१५ : पोलिसांच्या हाताला झटका देऊन दोन कैदी फरार. पाठलाग करून एकाला पकडले.
घाटीतील कैदी कक्षात दाखल कैदी रुग्णाच्या उपचारासंदर्भात समिती करण्यात आली आहे. यात विविध तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. कोणताही कैदी रुग्ण ३ दिवसांवर भरती राहणार नाही. वेळ आल्यास तसा समितीच निर्णय घेईल. - डॉ. संजय राठोड, अधिष्ठाता.