विकृत पुरुषांनाच घरात डांबण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 09:35 PM2019-12-01T21:35:40+5:302019-12-01T21:35:47+5:30
कायदा अधिकाधिक कठोर करून डॉ. प्रियंका यांच्या आरोपींना भरचौकात सर्वांसमक्ष शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी करीत गुलमंडी येथे महिलांनी प्रियंका रेड्डी यांच्या हत्येच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
औरंगाबाद : महिला जर सातच्या आत घरात आल्या तर बलात्काराच्या घटना टळतील, असे सर्रास बोलले जाते; पण महिलांना नव्हे, तर विकृत आणि समाजाला क ाळिमा फासणाऱ्या पुरुषांनाच सातच्या आत घरात डांबले पाहिजे. कायदा अधिकाधिक कठोर करून डॉ. प्रियंका यांच्या आरोपींना भरचौकात सर्वांसमक्ष शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी करीत गुलमंडी येथे महिलांनी प्रियंका रेड्डी यांच्या हत्येच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
गुलमंडी येथे भाजप महिला मोर्चा आघाडीच्या वतीने रविवारी सायंकाळी आयोजित निषेध सभेला विविध महिला मंडळांनी प्रतिसाद दिला. हैदराबाद येथे डॉ. प्रियंका यांच्यावर झालेला सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर त्यांची करण्यात आलेली निर्घृण हत्या याविषयीचा तीव्र संताप महिलांनी व्यक्त केला.
महाविद्यालयीन विद्यार्थिनींचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. ‘आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे’, ‘हम भारत की नारी हैं, फु ल नही चिंगारी हैं..’ अशा घोषणा देत महिलांनी या हत्येचा जाहीर निषेध केला.
अॅड. माधुरी अदवंत, लता दलाल, विजया अवस्थी, विजया कुलकर्णी, गीता आचार्य, सुरेखा पारवेकर, ज्योती भिलेगावकर, अनिल पैठणकर, चंद्रकांत वाजपेयी यांच्यासह विविध क्षेत्रांतील महिला उपस्थित होत्या.
अॅड. अदवंत म्हणाल्या की, आरोपीला पकडण्यास जेवढा उशीर लागतो, तेवढे पुरावे नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळे लवकरात लवकर आरोपीला पकडण्यात यावे, तसेच कायद्याच्या चौकटीत बसत नसले तरी आरोपीला भरचौकात सर्वांसमोर फासावर लटकवावे, जेणेकरून असे कृत्य करण्यास पुन्हा कोणी धजावणार नाही.
दलाल म्हणाल्या की, महिलांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी पर्समध्ये चाकूसारखी शस्त्रे बाळगावीत आणि वेळप्रसंगी त्याचा वापर करण्याचेही शिकावे. महिला सुरक्षाविषयक कायदे आणखी कठोर करावेत आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यांच्या शिक्षेचे स्वरूपही अधिकाधिक कठोर व्हावे, अशी मागणीही महिलांनी केली.