‘नो पार्किंग’ नाही, दुचाकी रस्त्याच्या कडेला, तरीही ‘उचलेगिरी’; वाहनधारकांतून संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 02:24 PM2024-09-26T14:24:17+5:302024-09-26T14:24:52+5:30
आरटीओ कार्यालयासमोरून दुचाकी उचलणाऱ्या वाहनाला मनसे पदाधिकाऱ्याने अडविले
छत्रपती संभाजीनगर : ‘नो पार्किंग’ नसताना आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी असतानाही कारवाईच्या नावाखाली वाहनांच्या ‘उचलेगिरी’विषयी वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. आरटीओ कार्यालयासमोर बुधवारी रस्त्याच्या कडेला असलेली ८ ते १० दुचाकी उचलून नेणाऱ्या वाहनाला मनसे पदाधिकाऱ्याने अडवत विरोध केला. जोपर्यंत दुचाकी सोडत नाही, तोपर्यंत जागेवरून हलणार, असा पवित्रा पदाधिकाऱ्याने घेतला. अखेर सर्व दुचाकी वाहने पोलिसांनी विनादंड सोडल्या.
महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तरीत्या रस्त्यावर उभी वाहने उचलण्याची मोहीम सुरू केली आहे. परंतु यात रस्त्याच्या कडेला उभी केलेली, ‘नो पार्किंग’च्या जागी नसलेली दुचाकी वाहने सर्रास उचलली जात असल्याची ओरड सर्वसामान्यांतून होत आहे. यातूनच बुधवारी आरटीओ कार्यालयासमोर चांगलाच राडा झाला. मनसेचे सुमित खांबेकर हे दुपारी १२ वाजेच्या सुमारास आरटीओ कार्यालयात आले होते. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेली वाहने उचलून नेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास पडले. दुचाकीधारक हात जोडून गाड्या सोडा, अशी विनंती करत होते. परंतु ‘छावणीला या आणि पैसे भरा’ अशी भाषा हे गाड्या उचलणारे मुले वापरत होते. हे सर्व पाहून सुमित खांबेकर यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना जेथून दुचाकी उचलल्या गेल्या आहेत, त्या गाड्या रस्त्यावर नाहीत. त्यामुळे त्या ज्यांच्या आहेत त्यांना द्या, ही मागणी केली.
दुचाकी ठेवलेले वाहनासह पळ, रिक्षाने नेले दुचाकीधारकांना
अखेर सर्व दुचाकी वाहने उतरून द्या, अशी सूचना पोलिस अधिकाऱ्यांनी केली. तरीही कंत्राटी काम करणाऱ्या मुलांनी वाहन पळवत दुचाकी छावणी येथे नेल्या. पोलिस कर्मचाऱ्यांनादेखील त्यांनी नेले नाही. जोपर्यंत दुचाकी देत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा सुमित खांबेकर यांनी घेतला. अखेर पोलिसांनी संबंधित दुचाकीधारकांना रिक्षाने छावणीला नेले आणि कुठलाही दंड न घेता दुचाकी सोडण्यात आल्याचे ‘मनसे’कडून सांगण्यात आले.
दादागिरी करून गाड्या उचलू नये
वाहने जर रस्त्यावर किंवा ‘नो पार्किंग’ लिहिलेल्या ठिकाणी असतील तर पोलिसांनी जरूर उचलाव्यात. परंतु जर दादागिरी करून बेकायदा गाड्या उचलल्या जात असतील तर मनसे मात्र विरोध करणार.
- सुमित खांबेकर, जिल्हा अध्यक्ष, मनसे, छत्रपती संभाजीनगर