रस्ता खोदून ना सूचनेचा बोर्ड, ना बॅरिकेड्स; दोघांच्या अपघातानंतर ठेकेदारावर थेट गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 08:03 PM2024-08-10T20:03:20+5:302024-08-10T20:03:28+5:30
दाेन वर्षांपूर्वीच या ठिकाणी तयार केलेला सुस्थितीत असलेला डांबरी रस्ता खोदून सिमेंट रस्ता तयार करण्याचा घाट घातल्याने या रस्त्यावरून वाद निर्माण झाले होते.
छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावरील ठेकेदाराने खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार बाप-लेक गंभीर जखमी झाले. या ठिकाणी आवश्यक सूचनेचा बोर्ड, बॅरिकेड्स न लावणाऱ्या ठेकेदारावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२२ जुलै रोजी रात्री ९ वाजता जगन्नाथ बाबुराव कुलकर्णी (३९, रा. नारेगाव) हे त्यांचा १० वर्षांचा मुलगा सोहमसह दुचाकीने घरी जात होते. मुकुंदवाडी येथील एसटी वर्कशॉप येथून वळण घेऊन ते फॅक्सोप्लास कंपनीच्या दिशेने जात होते. काही दिवसांपासून हा डांबरी रस्ता संपूर्ण खोदून नव्याने सिमेंटचा रस्ता तयार करण्यात येत आहे. परंतु याच रस्त्यावर लुपिन कंपनीच्या कॉर्नरजवळ कुलकर्णी यांचा रस्त्यावर खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडली. या अपघातात जगन्नाथ यांच्यासह त्यांचा लहान मुलगा गंभीररीत्या जखमी झाले. स्थानिकांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. दोघेही यात गंभीररीत्या जखमी झाले. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर जगन्नाथ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या रस्त्याचे काम घेतलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला. मात्र, निनावी ठेकेदार म्हणून आरोपीचा उल्लेख करण्यात आला आहे.
यापूर्वी देखील या रस्त्यावरून वाद
दाेन वर्षांपूर्वीच या ठिकाणी तयार केलेला सुस्थितीत असलेला डांबरी रस्ता खोदून सिमेंट रस्ता तयार करण्याचा घाट घातल्याने या रस्त्यावरून वाद निर्माण झाले होते. जालना रोड, एसटी वर्कशॉप ते एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे या मार्गावर हा रस्ता तयार केला जात आहे. एका राजकीय नेत्याच्या भावासह मोठ्या ठेकेदाराने या रस्त्याचे काम घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. काम घेतल्यानंतरही त्यात बेजबाबदारपणे खड्डे खोदून तसेच सोडून देण्यात आल्याने यापूर्वी येथे अनेक अपघात झाले. रविवारी अखेर, यात गुन्हा दाखल करण्यात आला. अंमलदार पंडित चव्हाण अधिक तपास करत आहेत.