'देशापुढे कोणी मोठे नाही'; ध्वजारोहणासाठी डॉ. कराड उशिरा आल्याने जलील, दानवे भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 07:00 PM2022-08-13T19:00:07+5:302022-08-13T19:00:58+5:30
घरोघरी तिरंगा लावा म्हणता आणि स्वतः ध्वजारोहणास उशीर करता.
औरंगाबाद: किल्ले अर्क परिसरात उभारण्यात आलेल्या १०० फुट उंच तिरंगा ध्वजाचे लोकार्पण कार्यक्रमात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड २० मिनिटे उशिरा आल्याने खा. इम्तियाज जलील चांगलेच भडकले. घरोघरी तिरंगा लावा म्हणता आणि स्वतः ध्वजारोहणास उशीर करता. देशापुढे कोणीही मोठे नाही, कोणतेही काम मोठे नाही, अशा शब्दात खा. जलील यांनी डॉ. कराड यांना कार्यक्रमस्थळी सुनावले. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील ध्वजारोहणास उशीर झाल्याने नाराजी व्यक्त केली.
आज सकाळी किल्लेअर्क परिसरात सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी शहरातील तिसऱ्या सर्वात उंच झेंड्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड याच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. यासाठी जिल्ह्याचे खासदार आणि सर्व आमदार आमंत्रित होते. खा. इम्तियाज जलील, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, मंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण वेळेच्या आधी कार्यक्रम स्थळी आले होते. दरम्यान, नियोजित ९.४५ वाजेची वेळ टळून गेली तरी केंद्रीय मंत्री भागवत कराड ध्वजारोहणास आले नाही. यामुळे खा. जलील आणि विरोधीपक्ष नेते दानवे चांगलेच संतप्त झाले. दरम्यान, १० वाजून २ मिनिटांनी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. जलील आणि दानवे यांनी रोष व्यक्त करताच, देशाच्या कार्यक्रमास विरोध करू नका, असे आवाहन करत डॉ. कराड यांनी वेळ मारून नेत ध्वजारोहण पार पाडले.
देशापुढे कोणी मोठे नाही
एकीकडे घरोघरी तिरंगा झेंडा लावा म्हणता आणि ध्वजारोहणास उशीर येऊन झेंड्याचा अपमान करता. दुसऱ्यांना आदर करा असे सांगता. २० मिनिटे मंत्री उशिरा कसे आले. दुसऱ्या कार्यक्रमास ठीक आहे . पण ध्वजारोहणास नको. देशा पुढे कोणी मोठे नाही.
- खा. इम्तियाज जलील