साखर कारखाना खरेदीस नाही कोणीही इच्छुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:05 AM2021-04-03T04:05:01+5:302021-04-03T04:05:01+5:30
लासूर स्टेशन : गंगापूर सहकारी साखर कारखाना खरेदी करण्यासाठी एकही जण इच्छुक नसून कोणीही अर्ज केलेला नाही. तसेच भाडेतत्त्वावर ...
लासूर स्टेशन : गंगापूर सहकारी साखर कारखाना खरेदी करण्यासाठी एकही जण इच्छुक नसून कोणीही अर्ज केलेला नाही. तसेच भाडेतत्त्वावर चालविण्यास घेण्यासाठी केवळ दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. यातील एक निविदा ही लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मुंबईद्वारे गंगापूर सहकारी साखर कारखाना विक्री किंवा भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी जाहीर निविदा काढण्यात आली होती. निविदा १६ ते ३० मार्चदरम्यान दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीसह अन्य एक निविदा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेण्यासाठी दाखल झाल्याची माहिती आज समोर आली आहे.
सद्यस्थितीत गंगापूर सहकारी साखर कारखाना सहकारी तत्त्वावर चालावा, यासाठी मोठे राजकारण तापलेले आहे. त्यामुळे बाजार समितीच कारखाना चालविण्याची शक्यता जास्त आहे. असे असले तरी आणखी एक निविदा दाखल झालेली आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावर देण्यासाठीचा अंतिम निर्णय होईपर्यंत काय घडामोडी घडतात, याकडे लक्ष लागले आहे. जर कदाचित कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठीची संधी बाजार समितीला मिळाली तर त्यासाठी लागणारा खूप मोठा पैसा उपलब्ध करण्याचे पहिले आव्हान बाजार समितीसमोर असणार आहे.