परतीचा पाऊस परतेना ! पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 02:32 PM2019-11-04T14:32:12+5:302019-11-04T14:35:56+5:30
परतीचा पाऊस अजूनही मराठवाड्याच्या काही भागांत सुरूच आहे.
औरंगाबाद : आधीच उशिरा येऊन पिकांचे वाटोळे केलेला परतीचा पाऊस अजूनही मराठवाड्याच्या काही भागांत सुरूच आहे. पिकांचे नुकसान सहन न झाल्याने हिंगोली जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला, तर नांदेड जिल्ह्यात वीज पडून माय-लेकी गंभीररीत्या होरपळल्या.
जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत रविवारी सायंकाळी दमदार पाऊस झाला. भोकरदन व परिसरात तीन-चार दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. या पावसामुळे तालुक्यातील अनेक नद्यांना पूर आला असून कोल्हापुरी बंधाऱ्याचे भराव वाहून गेले आहेत तर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६८८ मिमी असून आजवर जिल्ह्यात वार्षिक ८०० मिमीहून अधिक पाऊस झाला आहे. औरंगाबाद शहरात रविवारी सायंकाळी पाऊण तास मुसळधार पाऊस पडला.शनिवारी रात्री परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पिकांच्या नुकसानीत आणखी भर पडली आहे. जिल्ह्यामध्ये सरासरी २२.७४ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यात मानवत तालुक्यात ४७.३३ मि.मी., जिंतूर तालुक्यात ३१.५० मि.मी., पाथरी २७.३३, सेलू ४१.६० मि.मी. आणि सोनपेठ तालुक्यात ५० मि.मी. पाऊस झाला. जिंतूर तालुक्यातील बामणी मंडळात ७८ मि.मी. आणि मानवत तालुक्यातील कोल्हा मंडळात ६९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
धारूरमध्ये अतिवृष्टी
बीड : अवकाळी पावसाचा धुमाकुळ अजुनही सुरु असून जिल्ह्यातील धारुर आणि लोखंडी सावरगाव महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासात जिल्ह्यात एकूण सरासरी १६.५२ मिमी पावसाची नोंद झाली. बीड तालुक्यात १२.३६ मिमी, गेवराई १३.५०, अंबाजोगाई ३१.४०, माजलगाव ४४.६७, केज १४.५७, धारुर ४२ आणि परळी तालुक्यात २२.२० मिमी सरासरी पावसाची नोंद झाली. आष्टी, शिरुर आणि केज तालुक्यात निरंक नोंद झाली. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर वगळता इतर मंडळात निरंक नोंद आहे. धारुर तालुक्यातील धारुर मंडळात ९८ तर अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव मंडळात ६८ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील मंडळांत ४० ते ६२ मि. मी. पर्यंत पावसाची नोंद झाली आहे. तसेच बिंदुसरा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी वाढले असून कर्परा नदीला पूर आला आहे.
धानोरा गावात घुसले पुराचे पाणी; उर्वरित पिकांचेही नुकसान
बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने तालुक्यातील पूर्णा नदीला शनिवारी रात्रीपासूनच मोठा पूर आला. या पुराचे पाणी मध्यरात्री सेनगाव तालुक्यातील धानोरा बं. गावात घुसले होते. तसेच परिसरातील उरलेल्या पिकांचेही मोठे नुकसान झाले.
सेनगाव तालुक्यातील पूर्णा नदीला शनिवारी रात्री मोठा पूर आला. नदीच्या वरच्या भागात असलेल्या खडकपूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने तालुक्यातील धानोरा बं. गावातील काही भागात रात्री व सकाळच्या दरम्यान पुराचे पाणी घुसले होते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविले. दुपारनंतर पाण्याचा जोर ओसरला असला तरी या पुराने परिसरातील पिके वाहून गेली. शिल्लक काहीच राहिले नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रूपयांच्या शेतमालाचे नुकसान झाले. उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार जिवककुमार कांबळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी पाहणी केली.
‘खडकपूर्णा’चे पाणी ‘येलदरी’त
दोन दिवसांपूर्वी खडकपूर्णा प्रकल्पातून सोडलेले १ लाख क्युसेस पाणी येलदरी प्रकल्पात दाखल होण्यास सुरुवात झाली असून या प्रकल्पात आता ८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडून २ नोव्हेंबर रोजी १ लाख क्युसेक पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आले होते. हे पाणी येलदरी प्रकल्पामध्ये दाखल होत आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत येलदरी प्रकल्पा ८३ टक्के पाणीसाठा झाला होता. १२ वर्षानंतर येलदरी प्रकल्प १०० टक्के भरण्याची आशा निर्माण झाली आहे. या प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने तीनही जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला आहे.