देवगिरी किल्ल्यालगत रोप-वे करता येत नाही, अजिंठा लेणीत होणे शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 07:35 PM2022-04-09T19:35:58+5:302022-04-09T19:36:23+5:30
पर्यटनाला चालना देण्यासाठी, तसेच रस्त्यावर होणारी रहदारी कमी करण्यासाठी आता रोप-वे उभारण्याचा मुद्दा पुढे आला.
औरंगाबाद : जिल्ह्यातील पर्यटनस्थळ परिसरात रोप-वे उभारण्याच्या प्रयत्नांना वेग आला असून, शुक्रवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ऑस्ट्रियाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यालगत रोप-वे करता येत नाही. अजिंठा व्ह्यू पॉइंट ते लेण्यांपर्यंत रोप-वे होणे शक्य आहे, असा प्राथमिक सर्व्हे आला आहे. औरंगाबाद लेणी ते हनुमान टेकडी ते गणपती टेकडी व इतर ठिकाणी सर्व्हे करा, अशा सूचना राज्यमंत्री डॉ. कराड यांनी शुक्रवारी बैठकीत केल्या.
डॉ. कराड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, ऑस्ट्रियातील शिष्टमंडळासोबत दिल्लीत प्राथमिक चर्चा झाली आहे. म्हैसमाळ, दौलताबाद, औरंगाबाद लेणी, हनुमान टेकडी, गणपती टेकडी, अजिंठा लेणी येथील भाैगोलिक अभ्यास केल्यानंतर रोप-वे कुठे उभारता येईल, हे ठरेल. यासाठी भारतातील २ आणि ऑस्ट्रियातील १ कंपनी रोप-वे उभारण्याच्या अनुषंगाने सर्व्हे करणार आहे.
औरंगाबाद जिल्हा चारही बाजूंनी ऐतिहासिक स्मारकांनी वेढलेला आहे.
अजिंठा, वेरूळ लेणी ही जागतिक वारसा स्थळे या जिल्ह्यात आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी, तसेच रस्त्यावर होणारी रहदारी कमी करण्यासाठी आता रोप-वे उभारण्याचा मुद्दा पुढे आला. रोप-वे उभारण्याप्रकरणी दिल्लीतील कार्यालयात ऑस्ट्रियाचे प्रतिनिधी पीटर वॉलमन, स्टेन्बर्ग डनियल यांच्या उपस्थितीत भरत पाटील, प्रफुल चौधरी, प्रदीप सोदी, हिमांशू पृथ्वी यांची बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. रोप-वे उभारण्यासाठी युरोपियन तंत्रज्ञान वापरले जाणार असून, येणाऱ्या काळात औरंगाबादेत येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना त्याचा फायदा होईल, असा विश्वास डॉ. कराड यांनी व्यक्त केला.