पक्के घर नाही; घरकुलासाठी मिळते अनुदान, तुम्ही अर्ज केला का?
By विजय सरवदे | Published: February 14, 2024 08:06 PM2024-02-14T20:06:53+5:302024-02-14T20:07:19+5:30
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना आर्थिक परिस्थितीमुळे घर बांधणे शक्य होत नाही.
छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांसाठी ‘रमाई घरकूल योजना’ राबविली जाते. या योजनेंतर्गत सन २०१६-१७ ते २०२२-२३ या सात वर्षांच्या कालखंडामध्ये जिल्ह्यात १६ हजार ८१० घरकुले उभारण्यात आली. आता चालू आर्थिक वर्षात ६ हजार ८७७ घरे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना आर्थिक परिस्थितीमुळे घर बांधणे शक्य होत नाही. अशी बहुसंख्य कुटुंबे कच्च्या घरात किंवा झोपड्यांत राहतात; मात्र त्यांचेही जीवनमान सुधारावे, या हेतूने ज्यांच्याकडे स्वत:ची जागा आहे, अशा नागरिकांना राज्य शासनाने ‘रमाई घरकूल योजनें’तर्गत पक्के घरकूल उभारण्यासाठी अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे. यासाठी संबंधित नागरिकाची निवड ही ग्रामसभेत होणे गरजेचे असते. चालू आर्थिक वर्षात (सन २०२३-२४) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ६ हजार ८७७ घरे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
काय आहे ‘रमाई घरकूल योजना?’
अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ते कच्च्या तसेच झोपड्यांमध्ये राहत आहेत. बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे ही कुटुंबे पक्की घरे बांधू शकत नाहीत. त्यामुळे या कुटुंबांचे जीवनमान सुधारावे, या हेतूने शासनामार्फत रमाई घरकूल योजनेंतर्गत पक्के घर उभारण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
कोणाला मिळते अनुदान ?
अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना पक्के घर उभारण्यासाठी रमाई घरकूल योजनेचा लाभ दिला जातो.
निकष काय ?
लाभार्थी बेघर किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे. सन २०११ मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणाच्या प्राधान्यक्रम यादीत तो नसावा व महाराष्ट्र राज्याचा मागील १५ वर्षांपासूनचा रहिवासी असावा, असे या योजनेचे निकष आहेत.
चालू वर्षात पावणेसात हजार घरकुलांचे उद्दिष्ट
आता चालू आर्थिक वर्षात ६ हजार ८७७ घरे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
वीस हजार लाभार्थींना अनुदान मंजूर
योजना सुरू झाल्यापासून (सन २०१६-१७) या सात वर्षांत जिल्ह्यातील २० हजार ५४० लाभार्थींना अनुदानाचे सर्व चारही हप्ते वितरित करण्यात आले आहेत.
सात वर्षांची आकडेवारी काय सांगते ?
तालुका- मंजूर अनुदान- पूर्ण घरकूल
छत्रपती संभाजीनगर- ३५४१- २६७७ फुलंब्री- १४८८- ११४२ सिल्लोड- १९०६- १५४५ सोयगाव- ९९६- ७२६ कन्नड- २३४०- १८७७ खुलताबाद- ७७३- ६५२ गंगापूर- ३९५९- २८८१ वैजापूर- ३७३४- २९०७ पैठण- ३१८२- २४०३