नळाला नाही पाणी अन पाणीपट्टी ३० हजारी; सात वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेतील नागरिक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 05:08 PM2021-02-03T17:08:49+5:302021-02-03T17:12:06+5:30
सुरेवाडी गल्ली नंबर १ मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी २०१२ मध्ये नळ कनेक्शन घेतले होते.
औरंगाबाद : जाधववाडी परिसरातील सुरेवाडी येथील गल्ली नंबर १ मध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या नळाला ७ वर्षांपासून एक थेंबही पाणी आलेले नाही. महापालिकेकडून आता नागरिकांना २५ ते ३० हजार रुपयांचे पाणीपट्टी बिल देण्यात आल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. संतप्त नागरिकांनी मंगळवारी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सुरेवाडी गल्ली नंबर १ मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी २०१२ मध्ये नळ कनेक्शन घेतले होते. सुरुवातीला एक वर्ष नागरिकांना पाणीही मिळाले. २०१३ पासून नळाला पाणी येणे बंद झाले. परिसरातील सर्व नागरिकांनी महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंत्यांपर्यंत पाणी येत नसल्याच्या तक्रारी केल्या. वेळोवेळी अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणीसुद्धा केली. मागील सात वर्षांमध्ये नागरिकांना अजिबात पाणी मिळाले नाही. पाणी मिळावे यासाठी नागरिकांनी अनेकदा महापालिकेच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले. अलीकडेच सर्व नागरिकांना २५ ते ३० हजार रुपये पाणीपट्टी भरा, असे बिल महापालिकेकडून देण्यात आले.
महापालिकेकडून प्राप्त झालेले बिल पाहून नागरिक अवाक् झाले. मंगळवारी महिला आणि नागरिकांनी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. पाणीपट्टी रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी महिलांनी केली. महापालिकेने पाणीपट्टी माफ न केल्यास परिसरातील सर्व नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी पुष्पा चौधरी, सुवर्णा काथार, सुदर्शना पवार, इंदूबाई चौधरी, भागीरथी खंडागळे, कांताबाई कोंडके, किरण वाघ, संगीता तुपे आदींची उपस्थिती होती.