‘इथे नो टेन्शन’ ! कारण ‘रॅगिंग’ रोखण्यासाठी सिनिअरच बनले ‘बडी’

By संतोष हिरेमठ | Published: June 19, 2024 06:40 PM2024-06-19T18:40:38+5:302024-06-19T18:41:39+5:30

राज्यात पहिल्यांदा शासकीय दंत महाविद्यालयामध्ये ४ वर्षांपासून सुरू आगळीवेगळी संकल्पना

'No tension here' in Goverment Dental College Chhatrapati Sambhajinagar! Because seniors have become 'Buddies' to prevent 'ragging'. | ‘इथे नो टेन्शन’ ! कारण ‘रॅगिंग’ रोखण्यासाठी सिनिअरच बनले ‘बडी’

‘इथे नो टेन्शन’ ! कारण ‘रॅगिंग’ रोखण्यासाठी सिनिअरच बनले ‘बडी’

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील रॅगिंगचा मुद्दा नेहमीच गाजतो. छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही नुकताच रॅगिंगचा प्रकार समोर आला. मात्र, एक महाविद्यालय असे, जिथे दरवर्षी ज्युनिअर विद्यार्थ्यांचे सिनिअर्स ‘बडी’ म्हणजे मित्र बनतात. हे महाविद्यालय म्हणजे येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय. राज्यात पहिल्यांदा ‘डेंटल’मध्ये ‘बडी’ ही आगळीवेगळी संकल्पना याठिकाणी राबविली जात आहेत.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डाॅ. माया इंदूरकर यांच्या संकल्पनेतून ‘बडी’ हा उपक्रम २०२० पासून राबविण्यास सुरुवात झाली. दिल्लीतील महाविद्यालयांमध्ये अशाप्रकारची संकल्पना राबविली जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याची सुरुवात त्यांनी शासकीय दंत महाविद्यालयात सुरू केली. राज्यात ‘डेंटल’मध्ये ही संकल्पना राबविणारे छत्रपती संभाजीनगरचे शासकीय दंत महाविद्यालय हे पहिलेच असल्याचे त्यांनी सांगितले.

कशी राबविली जातेय ही संकल्पना?
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात दरवर्षी ६३ विद्यार्थी प्रवेश घेतात. या प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थ्याची जबाबदारी ही तृतीय वर्षाच्या एका विद्यार्थ्याला दिली जाते. म्हणजे प्रथम वर्षाच्या ६३ विद्यार्थ्यांची जबाबदारी ही तृतीय वर्षातील ६३ विद्यार्थी सांभाळतात.

कोणती मदत करतात ‘बडी’ ?
तृतीय वर्षाचे ‘बडी’ हे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला हवी असलेली मदत करतात. अभ्यासक्रमातील पुस्तके, शहरातील बाजारपेठेविषयी, कॅन्टीनच्या समस्येविषयी, काही गैरसोय होत असेल तर प्रथम वर्षाचा विद्यार्थी ‘बडी’ला सांगतो. त्यातून या प्रश्नांची सोडवणूक ‘बडी’ प्राधान्याने करतो. प्रत्येक ‘बडी’ नव्या विद्यार्थ्याची काळजी घेतो.

एकोपा निर्माण होण्यास मदत
महाविद्यालयात २०२० पासून ‘बडी’ संकल्पना राबविली जात आहे. त्यातून नव्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षातील विद्यार्थी हवी असलेली मदत करतात, माहिती देतात, मार्गदर्शन करतात. ‘बडी’ या उपक्रमामुळे ज्युनिअर आणि सिनिअर्समध्ये एकाेपा, विश्वासार्हता निर्माण होण्यास मदत होत आहे. त्यातूनच ‘रॅगिंग’सारख्या प्रकारालाही आळा बसण्यास मदत होत आहे.
- डाॅ. माया इंदूरकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

Web Title: 'No tension here' in Goverment Dental College Chhatrapati Sambhajinagar! Because seniors have become 'Buddies' to prevent 'ragging'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.