समृद्धी महामार्गावर नसणार ‘टोल प्लाझा’चा अडथळा; मात्र प्रवास असेल खर्चीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 03:57 PM2021-12-03T15:57:04+5:302021-12-03T16:00:02+5:30
Samrudhi Highway : ‘नागपूर ते मुंबई’ हे ७०१ किमीचे अंतर असून, ताशी १५० किमी या वेगाने वाहन धावण्याची क्षमता या महामार्गाची असेल.
- विजय सरवदे
औरंगाबाद : समृद्धी महामार्गाचे (Samrudhi Highway) काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या शीघ्रगती महामार्गावरून वाहनधारकांना विनाअडथळा प्रवास करता यावा, यासाठी महामार्गावर कुठेही ‘टोल प्लाझा’ नसेल (No 'Toll Plaza' obstruction on Samrudhi Highway). महामार्गावरून बाहेर पडताना इंटरचेंजच्या ठिकाणी ‘सर्व्हिस रोड’वर टोलबूथ असणार आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या या समृद्धी महामार्गावर सध्या ४ ठिकाणी टोल प्लाझा चालविण्यासाठी निविदा प्रक्रियेचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) मुख्यालयस्तरावर सुरू आहे.
‘नागपूर ते मुंबई’ हे ७०१ किमीचे अंतर असून, ताशी १५० किमी या वेगाने वाहन धावण्याची क्षमता या महामार्गाची असेल. या समृद्धी महामार्गावर एकूण २४ ठिकाणी इंटरचेंजेस आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या चार ठिकाणी इंटरचेंजेस उभारण्याचे कामही अंतिम टप्प्यात असून, शेंद्रा औद्योगिक वसाहतीत इंटरचेंज उभारण्यासाठी भूसंपादनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. इंटरचेंजपासूनच वाहनधारकांना या महामार्गावर प्रवेश करता येईल व बाहेरही पडता येणार आहे. या महामार्गावर अन्य कोठूनही प्रवेश करता येणार नाही किंवा बाहेरही पडता येणार नाही. तथापि, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महामार्गावरील प्रवास वाहनधारकांना चांगलाच खर्चीक ठरणार आहे. १.६५ रुपये प्रतिकिमी या दराने टोल आकारण्यात येणार आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बी. पी. साळुंके यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गावर ‘एक्झिस्ट बेस टोल’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. ज्यामुळे वाहनधारकांना विनाअडथळा अखंडपणे प्रवास करता येईल. सध्या राज्यामध्ये ‘एन्ट्रिबेस टोल’ अर्थात महामार्गावरून प्रवास करतानाच टोलसाठी थांबावे लागते. अनेकदा टोल प्लाझावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. या महामार्गाची संकल्पना मुळातच ‘सुपर एक्स्प्रेस-वे’ (शीघ्रगती महामार्ग) असल्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना टोलसाठी कुठेही थांबावे लागणार नाही. या महामार्गावर जेथून प्रवेश केला, तिथे संबंधित वाहनांची नोंद होईल व जिथे ते बाहेर पडेल तिथे ‘सर्व्हिस रोड’वर उभारण्यात आलेल्या टोलबूथवर प्रवास केलेल्या किलोमीटरनुसार ‘फास्ट टॅग’द्वारे आपोआप टोलची रक्कम कपात केली जाईल. सध्या टोल प्लाझा व पंप चालवण्यास देण्यासाठी ‘एमएसआरडीसी’च्या मुख्यालयस्तरावर निविदाप्रक्रिया राबविण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे ५० ते ६० किलोमीटर अंतरावर पेट्रोलपंप असेल. पेट्रोल उत्पादक कंपन्यांनाच या महामार्गावर पंप चालविण्यासाठी दिले जाणार आहेत.
असा आहे समृद्धी महामार्ग:
- जिल्ह्यातून ११२ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग
- एकूण १२० मीटर रुंदीचा ६ पदरी रस्ता असेल
- पोखरी शिवारात २९० मीटर लांबीचा बोगदा अंतिम टप्प्यात
- सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव, जांबरगाव या ५ ठिकाणी इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात
- महामार्गालगतच्या गावांमधील पादचाऱ्यांसाठी, वाहनांसाठी व प्राण्यांसाठी एकूण १२५ अंडरपास
- जिल्ह्यात औरंगाबाद, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांतील ७१ गावांमधून गेला समृद्धी महामार्ग