ना लखलखता प्रकाश, ना दिव्यांची आरास; आमची दिवाळी असते रानावनात मेंढ्यांच्या कळपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 07:09 PM2020-11-18T19:09:14+5:302020-11-18T19:10:06+5:30
उघड्या रानावनात आभाळाच्या छप्पराखाली व रात्रीच्या अंधारातच त्यांची दिवाळी येते आणि जाते
- रघुनाथ सावळे
उंडणगाव : दिवाळी म्हटले की, आनंदाचा महोत्सव शहर असो की गाव, सगळीकडे आनंदाला उधाण आलेले असते. मात्र, पिढ्यानपिढ्या दारिद्र्यात पिचलेल्या व गावोगाव मेंढ्या घेऊन भटकंती करणारा धनगर समाज या आनंदापासून वर्षानुवर्षे वंचित आहे.
गाव सोडून रानावनात मेंढ्यांच्या सान्निध्यातच त्यांची दिवाळी पार पडते. ना फटाके ना नवीन कपडे, ना लखलखता प्रकाश ना दिव्यांची आरास. उघड्या रानावनात आभाळाच्या छप्पराखाली व रात्रीच्या अंधारातच त्यांची दिवाळी येते आणि जातेही, मेंढरे व आपले काम भले यातच जीवन व आनंद सामावलेला असल्याचे ते आजही समजतात. दिवाळीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये काही दिवसांपासून धामधूम सुरू आहे. २१ व्या शतकातील मनुष्य हा चंद्रावर जाऊन आला आहे. जगामध्ये अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडू लागल्या आहेत. मात्र, या सर्व घडामोंडीपासून मागासलेल्या ‘धनगर’ समाज आजही कोसोदूर आहे. त्यांना जगाशी काहीही घेणे- देणे नाही. दिवाळी व पाडवा सणानिमित्त सर्वत्र आनंद संचारलेला असताना नेहमी जंगलात जीवन जगणाऱ्या मागासलेल्या ‘धनगर’ समाजाचे सर्व दिवस हे सारखेच असतात.
उघड्या रानावनात चूल पेटली की, त्या प्रकाशात जेवण करून घेणे व नंतर अंधारातच मेंढरांचा संभाळ करणे यातच ‘अपुलं जीवन - मरण समावलेलं आहे रं गड्या....!’ असे म्हणून धनगर समाजाचे मेंढपाळ हे दिवाळी सण साजरा करीत असतात. प्रवाहापासून कोसोदूर असलेल्या धनगर समाजाने आता एसटी प्रवर्गात आरक्षणासाठी लढाई सुरू केली आहे. मात्र, या लढाईत शिकलेला किंवा एकाच ठिकाणी स्थायी झालेले समाजबांधवच पुढाकार घेत आहेत. रानावनात मेंढ्या घेऊन भटकणारा समाज आजही यापासून खूप दूर आहे. आमच्या समाजात नेमका ‘प्रकाश’ कधी पडेल, असा प्रश्न आता या समाजातील शिकलेले तरुण व्यक्त करू लागले आहेत.
जुने कपडे... अन् त्यालाही ठिगळं...!
दिवाळीनिमित्त सर्वच जण नवीन कपडे घेऊन आनंदोत्सव साजरा करतात. मात्र, आमच्या नशिबी आठराविश्वे दारिद्र्य व नीट पोटाला भाकरही मिळत नाही. आमच्या अनेक लेकरांचे बालपणही मेंढरांसोबतच रानावनात जाते. अनेक दिवस नातेवाईक भेटत नाहीत. अंगावरील फाटक्या कपड्यांना ठिगळांचा आधार दिलेला असतो. आमची दिवाळी ही अशीच येते आणि जाते. संपूर्ण आयुष्यात ऐशआराम, लखलखाट काय असतो, याच्या जवळ कधीच गेलो नाही. अशी खंत या समाजातील बाळू शंकर सावळे या मेंढपाळाने व्यक्त केली.