‘पाणी नाही, किमान वीज तरी द्या!’; शहरात रोजच होतेय दिवसा अन् रात्री बेरात्री वीज ‘गुल’
By संतोष हिरेमठ | Published: May 24, 2023 06:38 PM2023-05-24T18:38:35+5:302023-05-24T18:39:30+5:30
ऐन उन्हाळ्यात हा प्रकार होत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ ओढावते आहे.
छत्रपती संभाजीनगर : जगाच्या नकाशावर औद्योगिकनगरी, पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरात नागरिकांना आठवड्यातून जेमतेम तासभर पाणी मिळते, पण या शहरात अखंडित वीजपुरवठाही होत नसल्याची चिंताजनक परिस्थिती आहे. शहरात कधीही अचानक वीजपुरवठा खंडित होतो. त्यातही गेल्या पाच दिवसांपासून रोज दिवसा व रात्रीही वीज ‘गुल’ होत आहे. महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरात १८ मेपासून दररोज रात्री वीज गुल होते आहे. ऐन उन्हाळ्यात हा प्रकार होत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ ओढावते आहे. मुंबई, पुण्यात वीज जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही, उन्हाळा असो की पावसाळा छत्रपती संभाजीनगरातच वारंवार वीज का ‘गुल’ होते, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरवर्षी मान्सूनपूर्व कामे केली जातात. परंतु, पहिल्या पावसापासून वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडतो. किमान यंदा तरी पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहण्याची अपेक्षा आहे.
जुनी यंत्रणा बदलावी
महावितरणने देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही. विद्युत वाहिन्यांसह इतर यंत्रणा जुनी आहे. उन्हाळ्यात भार वाढतो. परंतु, त्या प्रमाणात देखभाल-दुरुस्ती होत नाही. त्यातून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराविषयी महावितरणच्या अभियंत्यांशी वारंवार संपर्क साधण्यात आला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.
- हेमंत कपाडिया, ऊर्जा मंच
लहान-मोठ्या उद्योगांना फटका
वीजपुरवठा खंडित होण्याचा फटका २४ तास प्राेसेसिंग असलेल्या उद्योगांना बसतो. वीज गेल्यानंतर प्रोसेसिंग थांबते आणि कच्च्या मालाचे नुकसान होते. त्यासोबत लहान-मोठ्या उद्योगांनाही नेहमीच फटका बसतो. अशावेळी महावितरणकडे तक्रार केली तर उडवाउडवीचे उत्तर मिळते.
- वसंत वाघमारे, अध्यक्ष, वाळूज इंडस्ट्रियल असोसिएशन
कधीही जाते वीज
वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होतो. पाणी येण्याच्या वेळेतही वीज जाते. त्याचाही फटका बसतो. गेल्या काही दिवसांपासून रात्री वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
- दीपक संभेराव, वीज ग्राहक
शहरातील वीज ग्राहक
- घरगुती- २,९६,११४
- व्यावसायिक-३४,५५६
- औद्योगिक- ९,७०३
- दिवाबत्ती-१,४५९
- शेतीपंप-२,१७९
- पाणीपुरवठा - १०५
- इतर २,३६१
एकूण : ३,३४,४७७
- पाणीपुरवठा-४६
- महिन्यांचे वीज बिलिंग-सुमारे १६८ कोटी रुपये.