नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जुन्या छत्रपती संभाजीनगरात आज निर्जळी
By मुजीब देवणीकर | Published: January 1, 2024 02:19 PM2024-01-01T14:19:05+5:302024-01-01T14:19:56+5:30
सिडको-हडकोसह जुन्या शहरातील पाणीपुरवठा अगोदरच विस्कळीत झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहराची तहान भागविणाऱ्या ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला पाच ठिकाणी गळती असल्यामुळे सोमवारी सकाळी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. तब्बल दहा तास दुरुस्तीचे काम चालणार असून, पाणीपुरवठ्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्यात आले. नवीन वर्षाच्या प्रारंभीच शहराला निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवारी जायकवाडी पंप हाऊस येथे सकाळी ११ वाजता विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी शहरातील अनेक वसाहतींना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सिडको-हडकोसह जुन्या शहरातील पाणीपुरवठा अगोदरच विस्कळीत झाला आहे. त्यात रविवारी सायंकाळी जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला पाच ठिकाणी मोठे लिकेज असल्याचे समजले. लिकेज मोठे असल्यामुळे शहरात अत्यंत कमी प्रमाणात पाणी येत आहे. ढोरकीन पंप हाऊस, ढोरकीन प्राथमिक आरोग्य केंद्र, ढाकेफळ फाटा, फरशी नाला आणि नक्षत्रवाडी पंप हाऊस या पाच ठिकाणी लिकेज असल्याचे मनपा पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले.
सोमवारी सकाळी १० वाजता पाचही ठिकाणी एकाच वेळी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. दुरुस्तीसाठी जवळपास दहा तास लागणार आहेत. दिवसभर ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीद्वारे येणारे पाणी बंद राहील. सोमवारी जुन्या शहरात ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते, त्यांना आता मंगळवारी पाणी देण्याचे आश्वासन महापालिकेने दिले आहे.
४९ वर्षे जुनी जलवाहिनी
१९७२-७३ च्या दुष्काळानंतर हर्सूल तलावाचे पाणी शहराला कमी पडू लागले. त्यामुळे युद्धपातळीवर १९७४ मध्ये जायकवाडीहून ७०० मिमी जलवाहिनीद्वारे शहरात पाणी आणण्यात आले होते. ४० एमएलडी पाणी शहरात येत होते. या जलवाहिनीला ४९ वर्षे होत आहेत. जलवाहिनीची जाडी अनेक ठिकाणी अत्यंत कमी झाली. किंचितही धक्का लागला तर ती फुटते. पर्याय नसल्यामुळे ही जलवाहिनी अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. जेमतेम २५ ते ३० एमएलडी पाणी जलवाहिनी शहराला देते.