"पाणी नाही, पाहुण्यांनो येऊ नका";गोकुळनगरवासीयांनी नातेवाईकांना कळविला संदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 05:39 PM2019-05-09T17:39:19+5:302019-05-09T17:41:44+5:30

संपूर्ण वसाहत टँकरवर अवलंबून

'No water, no guests should come' '; Gokul Nagar residents send message to relatives | "पाणी नाही, पाहुण्यांनो येऊ नका";गोकुळनगरवासीयांनी नातेवाईकांना कळविला संदेश 

"पाणी नाही, पाहुण्यांनो येऊ नका";गोकुळनगरवासीयांनी नातेवाईकांना कळविला संदेश 

googlenewsNext

औरंगाबाद : चार ते पाच  दिवसांनी टँकर येते. त्यात एक ड्रम पाणी मिळते. अधिकचे पैसे मोजूनही नंतर पाणी मिळत नाही. एका ड्रमातूनच काटकसरीने पिण्यासाठी व सांडपाण्यासाठी वापर करावा लागतो. पाणीटंचाई लक्षात घेता उन्हाळ्याच्या सुटीत कोणी येऊ नये, असे आम्ही नातेवाईकांना कळविले आहे, असे गोकुळनगरवासीयांनी सांगितले. या ‘वाक्यातूनच’ शहरात पाण्याची किती भीषण परिस्थिती आहे हे दिसून येते.

जाधववाडी परिसरातील सुरेवाडीतील अखेरच्या तीन गल्ल्या, तसेच गोकुळनगर, घृष्णेश्वरनगर, वसंतनगर, छत्रपती कॉलनी, भक्तीनगर, व्यंकटेशनगर या सुमारे १२०० लोकांची वसाहत संपूर्णपणे टँकरवर अवलंबून आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत असूनही मागील १४ ते १५ वर्षांपासून या परिसरात पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली नाही. परिसरातील लोकांनी बोअर घेतले आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस पाणी अटत असते. मात्र, यंदा जानेवारी महिन्यातच येथील बहुतांश बोअरचे पाणी अटले. सुरुवातीला एक दोन महिने सुरेवाडीतील नागरिकांनी नळाचे पाणी भरू दिले, पण त्यांनाच पाणी कमी पडू लागल्याने त्यांनी पाणी देणे बंद केले. यामुळे आता येथील रहिवाशांची संपूर्ण भिस्त टँकरवरच आहे.

गोकुळनगरातील रहिवासी ज्योती जैस्वाल यांनी सांगितले की, प्रत्येक गल्लीतील २० घरांनी मिळून एक टँकर लावले आहे. तीन महिन्याला प्रत्येक जण ११६० रुपये देतो तेव्हा दर चार दिवसांनी मनपाचे टँकर येते. एक ड्रम भरून दिला जातो. मात्र, आता तीन महिन्यांऐवजी प्रत्येक महिन्याला ५०० रुपये घेतले जात आहेत. दुसरा ड्रम भरण्यासाठी ५० रुपये अधिकचे द्यावे लागत आहेत. याशिवाय पाणी कमी पडले तर अधूनमधून २ हजार लिटरचे खाजगी टँकर ५०० रुपये देऊन आणावे लागत आहे. कैलास जाधव यांनी सांगितले की, पाणीटंचाईमुळे नातेवाईकांना उन्हाळ्याच्या सुटीत येऊ नका, असे कळविले आहे.  नगरसेवक सीताराम सुरे यांनी सांगितले की, गोकुळनगर व आसपासच्या कॉलनीत १२०० लोकांची वसाहत आहे. तेथे पाईपलाईन टाकण्यात यावी, असा प्रस्ताव मनपाकडे अनेकदा दिला, पण तो मंजूर होत नाही.

जलवाहिनीची प्रतीक्षा 
विशाल जगधने म्हणाले की, गोकुळनगर परिसरातील नागरिक मागील १४ वर्षांपासून पाईपलाईनची प्रतीक्षा करीत आहोत. मनपाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका येथील रहिवाशांना बसत आहे. 

Web Title: 'No water, no guests should come' '; Gokul Nagar residents send message to relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.