तण वाढ नाही, पाणीही लागते कमी; शेतकऱ्यांसाठी मल्चिंग पेपर ठरतोय उत्पन्न वाढीसाठी वरदान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 08:16 PM2024-08-16T20:16:48+5:302024-08-16T20:17:02+5:30

पारंपरिक शेती केल्याने शेतीतून उत्पन्न कमी आणि कष्ट आणि खर्च जास्त होत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आधुनिक शेती करण्याकडे वळले आहेत.

No weed growth, less water required; For farmers, mulching paper is becoming a boon for increasing income | तण वाढ नाही, पाणीही लागते कमी; शेतकऱ्यांसाठी मल्चिंग पेपर ठरतोय उत्पन्न वाढीसाठी वरदान

तण वाढ नाही, पाणीही लागते कमी; शेतकऱ्यांसाठी मल्चिंग पेपर ठरतोय उत्पन्न वाढीसाठी वरदान

- सोपान कोठाळे
केळगाव :
सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरातील अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. भाजीपाल्यासह इतर पिकांसाठी शेतकरी मल्चिंग पेपरचा वापर करत असून या पेपरमुळे जमिनीत तणाची वाढ होत नसून पिकांसाठी पाणीदेखील कमी लागत आहे. परिणामी, हा पेपर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

पारंपरिक शेती केल्याने शेतीतून उत्पन्न कमी आणि कष्ट आणि खर्च जास्त होत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आधुनिक शेती करण्याकडे वळले आहेत. शेतात तण वाढू नये, पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये, त्यासाठी पाणी कमी लागावे, पिकाचे संरक्षण व्हावे, शेतीतून अधिक उत्पन्न मिळावे, याकरिता सद्य:स्थितीत शेतकरी अनेक उपाययोजना करताना दिसून येत आहेत. केळगावसह आमठाणा, शिंदेफळ परिसरातील शेतकरी मिरची, कापूस यासारख्या पिकाला संरक्षण मिळावे म्हणून मल्चिंग पेपरचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. याशिवाय या पेपरमुळे तापमान आणि आर्द्रतेवर नियंत्रण राहत असल्याने पीक वाढीला मोठा फायदा होतो. अधिक पाऊस झाला तरी त्याचा फारसा परिणाम या पिकावर होत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या पेपरची मागणी बाजारात वाढताना दिसत आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे पाण्याची कमतरता शेतकऱ्यांना भासत असते. त्यामुळे अनेक शेतकरी या पेपरचा पिकासाठी वापर करत आहेत.

मल्चिंग पेपरचे बंडल मिळते चौदाशे रुपयांना
मल्चिंग पेपरच्या एका बंडलची किमत बाजारात १ हजार ४०० रुपये असून त्याचा वापर मिरचीच्या एक हजार रोपांसाठी केला जातो. या रोपासाठी पाच गुंठे शेती लागते. हा पेपर महाग जरी असला तरी मिरचीचे उत्पन्न वाढत असल्याने ते खरेदी करण्यास शेतकऱ्यांना परवडत आहे.

पिकाची उगवण्याची क्षमता चांगली
मल्चिंग पेपरमुळे पिकातील खुरपणीच्या खर्चात मोठी बचत असून त्याला हाताने खत टाकण्याची गरज नसते. यामुळे मजुरी खर्च वाढतो. या पेपरमुळे ड्रीपद्वारे पिकास खत सोडण्यास सोपे जात असून खर्चाची बचत होते. पिकाची उगवण्याची क्षमता चांगली असते.
- सागर पंडित, शेतकरी, शिंदेफळ

Web Title: No weed growth, less water required; For farmers, mulching paper is becoming a boon for increasing income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.