‘कुणी कुणाचं नसतं... शिकवून गेला कोरोना’

By | Published: November 22, 2020 09:01 AM2020-11-22T09:01:30+5:302020-11-22T09:01:30+5:30

औरंगाबाद : ‘कुणीच कुणाचं नसतं, हेच कोरोना शिकवून गेला आणि म्हणून स्वत:च स्वतःची काळजी घ्या, गर्दीत जाणं टाळा, तोंडाला ...

‘Nobody belongs to anyone ... taught Corona’ | ‘कुणी कुणाचं नसतं... शिकवून गेला कोरोना’

‘कुणी कुणाचं नसतं... शिकवून गेला कोरोना’

googlenewsNext

औरंगाबाद : ‘कुणीच कुणाचं नसतं, हेच कोरोना शिकवून गेला आणि म्हणून स्वत:च स्वतःची काळजी घ्या, गर्दीत जाणं टाळा, तोंडाला मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा,’ असे कळकळीचे आवाहन प्रख्यात प्रबोधनकार, कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले.

‘लोकमत’चे एडिटर इन चीफ व राज्याचे माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त ते ऑनलाईन कीर्तन करीत होते. हे ऑनलाईन कीर्तनही तेवढ्याच ताकदीचे ठरले. कोरोना काळातही त्यांच्या चाहत्यांनी यू-ट्यूब, फेसबुक आणि व्हाॅटस्‌ॲपच्या माध्यमातून त्यांच्या गाजलेल्या कीर्तनाचा मनमुराद आनंद लुटला.

राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त मागील २२ वर्षांपासून इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचे रेकॉर्ड तुटत चालले होते. दरवर्षी गर्दीचे उच्चांक मोडले जात होते. यावर्षी कोरोनामुळे कीर्तनात खंड पडतो की काय, असे वाटत होते; परंतु संयोजक बबनराव डिडोरे पाटील यांनी हा योग जुळवून आणलाच.

महाराजांचे ऑनलाईन कीर्तनही तेवढेच रंगले. टाळ आणि टाळ्यांचा गजर घुमत राहिला.

‘जन्मा आलो त्याचे... आजि फळ झाले साचे’ तुकाराम महाराजांच्या या अभंगाभोवती हे कीर्तन फुलत गेले. इंदोरीकर महाराजांनी ते खुलवले.

अनेक कीर्तनकार ‘लग्न साध्या पद्धतीनं करा, खर्चाला आळा घाला हे सांगून मरून गेले; पण कुणी ऐकलं नाही. कोरोनामुळं आता बघा लग्नं कशी साधी होत आहेत,’ ही बाब महाराजांनी अधोरेखित केली.

.............

लोकांचं मला खूप प्रेम मिळालं...

राजेंद्र दर्डा यांनी यावेळी आपलं मनोगत मांडले. महाराजांच्या कीर्तनाची बावीस वर्षांची परंपरा खंडित झाली नाही, याचा मला आनंद आहे. महाराजांच्या हातून सातत्यानं कीर्तन सेवा घडतेय. त्यांचा मी खूप-खूप आभारी आहे.

लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं. तीन वेळा आमदार, मंत्रीपद मिळालं. विकासाची अनेक कामं करता आली, असं सांगत राजेंद्र दर्डा यांनी, कोरोनामुळं नैराश्य येऊ देऊ नका. कारण उद्याची पहाट आपली आहे, अशी साद घातली व लोकांमधला आत्मविश्वास जागवला.

मृदंगाचार्य संतोष महाराज सोळंके व हार्मोनियमवादक माधवबुवा पितरवाडकर यांची सुरेख साथसंगत व ह.भ.प. पोपट महाराज फरकाडे, ह.भ.प. सुंदरराव महाराज काळे, ह.भ.प. काशीनाथ महाराज जाधव यांच्या गोड गळ्याने उत्तरोत्तर इंदोरीकर महाराजांचे कीर्तन रंगतच गेले. अनेक अभंग, भजने आणि लोकप्रिय गीतांच्या चालीवरच्या गाण्यांची छान पेरणी, हे तर या कीर्तनाचे मोठे वैशिष्ट्य ठरले. त्यात इंदोरीकर महाराजांनी आपल्या आवाजात खास लकबीसह गायलेली गाणी अवीटच. रमेश दिसागज यांच्या प्रारंभीच्या हळुवार सूत्रसंचालनाने कीर्तनाला पूरक वातावरण निर्माण करून दिले. सायली डिडोरे यांनी इंदोरीकर महाराज आणि राजेंद्र दर्डा यांना औक्षण केले. बबनराव डिडोरे, अजय डिडोरे, विजय दिसागज आदींनी राजेंद्र दर्डा यांचा सत्कार करून अभीष्टचिंतन केले.

मोठं होण्यासाठी हे हवं...

कोणत्याही क्षेत्रात मोठं होण्यासाठी प्रारब्ध अनुकूल असावं, कर्म चांगलं असावं, संतांचे आणि आई-वडिलांचे आशीर्वाद मिळाले पाहिजेत. शास्त्रकृपा, गुरुकृपा, अंत:करणकृपा आणि ईश्वरकृपा असावी लागते. दर्डा साहेबांना हे सारं प्राप्त झालेलं आहे, म्हणूनच ते मोठे आहेत. ते त्यांच्या क्षेत्रात मोठे आहेत. सर्व सेवांमध्ये त्यांचं जीवन सफल झालंय. (टाळ्या) गरिबांच्या गालावरून हसू श्रीमंतांची श्रीमंती वाढवतं. (टाळ्या) दर्डा साहेबांनी शेकडो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या घरी आनंद फुलवला. ते आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि समाधान आहे. (टाळ्या).

तुकाराम महाराजांची दु:खं कशी वाढली, त्यातून त्यांना आलेली उदासीनता आणि देवाशिवाय आता आपल्याला कुणी नाही, ही झालेली जाणीव याची महाराजांच्या तोंडून कथा ऐकताना भाविक तल्लीन झाले होते. कीर्तन संपूच नये, असे वाटत असताना ते संपून गेले होते... एक ऊर्जा व प्रेरणा देऊन!

Web Title: ‘Nobody belongs to anyone ... taught Corona’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.