उन्नत भारत अभियानाचे विद्यापीठ बनले नोडल केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:10 AM2019-05-23T00:10:18+5:302019-05-23T00:10:56+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उन्नत भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी हिताच्या आणि ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनासाठी विभागीय नोडल केंद्र स्थापन केले आहे. यासाठी विद्यापीठ आणि आयआयटी दिल्ली यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उन्नत भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी हिताच्या आणि ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनासाठी विभागीय नोडल केंद्र स्थापन केले आहे. यासाठी विद्यापीठ आणि आयआयटी दिल्ली यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली.
विद्यापीठाला उन्नत भारत अभियानाचे क्षेत्रीय नोडल केंद्र मंजूर झाल्याबद्दल कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. टी. आर. पाटील यांची उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उन्नत भारत अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या अध्यक्षपदी संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर आहेत. तर आयआयटी दिल्ली संस्था हा प्रकल्प राबवत आहे. या अभियानासाठी राज्यातील चार विद्यापीठांची, १२ जिल्ह्यांची आणि ६२६ गावांची निवड केली आहे. या सर्व अभियानाचे नोडल केंद्र औरंगाबादचे विद्यापीठ असणार आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने उन्नत भारत अभियानात सुरुवातीला पाच गावे दत्तक घेतली होती. यामध्ये गेवराई कुबेर, मावसाळा, करोडी, चांदापूर आणि चिंचोली बुद्रुक या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये हे अभियान यशस्वी केल्यामुळे विद्यापीठाला नोडल केंद्र देण्यात आले आहे. तसेच २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ५५ महाविद्यालयांनी अभियानाचा प्रचार-प्रसार केला. त्याची दखल दिल्ली आयआयटीने घेतली असल्याचेही डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले. या अभियानासाठी लागणारा निधीही विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून रासेयोचे संचालक डॉ. टी. आर. पाटील हे काम पाहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चौकट
गावांमधील या समस्यांचे करणार निवारण
उन्नत भारत अभियानामध्ये राज्यातील १२ जिल्ह्यांची निवड केली आहे. या जिल्ह्यांतील ६२६ गावांत अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी १३० शिक्षणसंस्था, महाविद्यालयांची निवड केली आहे. या अभियानात प्रामुख्याने गावातील स्वच्छतागृहे, पिण्याचे स्वच्छ पाणी, वीज, शेतसंबंधी विविध योजनांची अंमलबजावणी, सिंचन, तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षणाचा प्रचार व प्रसार, आरोग्य सुविधांची उपलब्धी आणि गावातील आवश्यक असलेले कार्य करण्यात येणार असल्याचे डॉ. टी. आर. पाटील यांनी सांगितले.
------------