असहकार आंदोलन
By Admin | Published: February 17, 2016 10:53 PM2016-02-17T22:53:58+5:302016-02-17T23:02:07+5:30
कळमनुरी: कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाच्या उदासीन धोरणामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन राज्य महासंघाने असहकार आंदोलनाचा निर्णय घेतला.
कळमनुरी: कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाच्या उदासीन धोरणामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन राज्य महासंघाने असहकार आंदोलनाचा निर्णय घेतला.
१८ तारखेपासून बारावीच्या उत्तरपत्रिका संथगतीने तपासून महाराष्ट्रभर हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यातील ६० हजार शिक्षक सहभागी होणार आहेत. प्रमुख मागण्यांमध्ये आॅनलाईन संच मान्यतेतील सर्व त्रुटी दूर करून प्रचलित निकषानुसार संचमान्यता करण्यात यावी, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकन पात्र कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान द्यावे, चोवीस वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी देण्यात यावी, कनिष्ठ महाविद्यालयीन प्रशासन स्वतंत्र करण्यात यावे, एम.फिल., पीएच.डी.साठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वरिष्ठ महाविद्यायीन शिक्षकाप्रमाणे लाभ द्यावा, कायम शिक्षकांना कार्यभार सलग तीन वर्षे २५ टक्क्यांपेक्षा कमी होईपर्यंत त्यांना अतिरिक्त ठरवू नये, स्वयंअर्थसहायित महाविद्यालयांना बृहत आराखड्यानुसार आवश्यकता असल्यासच परवानगी द्यावी, अभियांत्रिकी प्रवेशासाठी १२ वी बोर्ड परीक्षेतील गुणांना व सीईटीच्या गुणांना ५०-५० टक्के धरुनच मेरीट लिस्ट बनवावी, उपप्राचार्य व पर्यवेक्षक यांच्या ग्रेड पेमध्ये वाढ करावी इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राज्य अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख, सरचिटणीस प्रा. संजय शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन थोरात असोलेकर, सचिव प्रा. सुनील कावरखे, उपाध्यक्ष प्रा. येवले, प्रा. संजय चाटे, सहसचिव प्रा. मस्के, कोषाध्यक्ष प्रा. यू.आर. नगराह, प्रा. प्रमोद पवार, प्रा. माधव रोेडगे, प्रा. सुदर्शन देशमुख, प्रा. रमेश वाहूळे, प्रा. राम तोडकर यांनी केले आहे. (वार्ताहर)