लघु उद्योगासाठी पोलीस पाल्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 04:34 PM2018-06-05T16:34:40+5:302018-06-05T16:40:01+5:30
एकलव्य योजनेंतर्गत पोलिसांच्या पाल्यांना शिक्षणासाठी २५ हजार रुपये अनुदान आणि शिक्षणानंतर त्यांना लघु उद्योजक बनविण्यासाठी एक लाखाचे बिनव्याजी भांडवलही देण्याची शासनाची योजना
औरंगाबाद : रात्रंदिवस कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना त्यांच्या कुटुंबाकडे फारसे लक्ष्य देता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन एकलव्य योजनेंतर्गत पोलिसांच्या पाल्यांना शिक्षणासाठी २५ हजार रुपये अनुदान आणि शिक्षणानंतर त्यांना लघु उद्योजक बनविण्यासाठी एक लाखाचे बिनव्याजी भांडवलही देण्याची शासनाची योजना असून, त्याची येथे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सोमवारी येथे दिली.
पोलीस कल्याण उपक्रमाविषयी माहिती देताना पोलीस आयुक्त म्हणाले की, जूनचा पहिला आठवडा हा पोलीस कल्याण सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. पोलीस पाल्यांसाठी शासनाने विविध योजना आणल्या असून, या योजनांची माहिती आज घेण्यात आलेल्या पोलीस आणि त्यांच्या पाल्यांच्या शिबिरात देण्यात आली. वैद्यकीय, अभियांत्रिकीचे उच्चशिक्षण घेणाऱ्या पोलीस पाल्यांना २५ हजार रुपये अनुदान आणि ५० हजार रुपये कर्ज देण्यात येत आहे. शिवाय बेटी बचाव बेटी पढाव योजनेंतर्गत पोलिसांच्या पाचवी ते दहावीतील मुलींना दरवर्षी ५०० रुपये दिले जातात. एकलव्य योजनेंतर्गत शिक्षणासाठी आणि शिक्षण झालेल्या पोलीस पाल्यांना रोजगाराभिमुख शिक्षण दिले जाते. कुशल तरुणांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी उपलब्ध केली जाणार आहे. जे तरुण लघु उद्योग करण्याची इच्छा व्यक्त करतात त्यांना उद्योग उभारण्यासाठी पोलीस खात्याकडून एक लाख रुपये बिनव्याजी देण्यात येतील.
आयुक्तालयाच्या वतीने शहर पोलिसांच्या पाल्यांसाठी लघु उद्योग मार्गदर्शन शिबीर सोमवारी सकाळी पार पडले. बँकेकडून मिळणारे कर्ज आणि प्रकल्प अहवाल कसा तयार करावा, याबाबत मार्गदर्शन त्यांना आजच्या शिबिरात करण्यात आल्याचे प्रसाद म्हणाले. शिबिरात चिरंजीव प्रसाद, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी सुदाम नलावडे, प्रकल्प अधिकारी भारती सोसे, किशोर अंभोरे, सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, सचिव अनंत पोळ, जर्मन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रेनिंगचे रवी कोरगल, महिला आयटीआयचे प्राचार्य भिलेगावकर उपस्थित होते.
पोलीस जाणार पिकनिकला
पोलीस कल्याण सप्ताहांतर्गत शहरातील पोलिसांना पिकनिकसाठी पुणे, शिर्डी, महाबळेश्वरला पाठविले जात आहे. पोलिसांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी केली जात आहे, अशी माहितीही यावेळी प्रसाद यांनी दिली.