नोटाबंदी; काँग्रेसचे आंदोलन
By Admin | Published: January 3, 2017 12:04 AM2017-01-03T00:04:53+5:302017-01-03T00:06:51+5:30
जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन ५० दिवस पूर्ण झाले आहेत.
जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन ५० दिवस पूर्ण झाले आहेत. अद्याप सामान्य लोकांसह शेतकऱ्यांच्या अडचणीत संपलेल्या नाहीत. या निर्णयाच्या निषेधार्थ तालुका व जिल्हास्तरावर तसेच काँग्रेसच्या महिला आणि युवक शाखेतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आ. विक्रम काळे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, औरंगाबादचे माजी महापौर अशोक सायन्ना, शकुंतला शर्मा, विमल आगलावे, शीतल तनपुरे, आर. आर. खडके, राजेंद्र राख, शहराध्यक्ष अब्दुल हफीज, शेख महेमूद, ज्ञानेश्वर भांदरगे, प्रशांत वाढेकर उपस्थित होेते.
माजी आ. काळे म्हणाले, सरकारला नोटांमधील एखादी मालिका रद्द करता येऊन शकते. संपूर्ण नोटा बंद करण्याचा कायद्याने सरकारला अधिकारी नाही. एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा पंतप्रधान मोदी यांनी चलनातून बाद करुन कायद्याचा भंग केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच याविरोधात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्याची माहितीही त्यांनी दिली.
ज्या तीन उद्देशांसाठी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यातील एकही उद्देश सफल झाला नसल्याचा आरोप करुन परदेशात असलेला भारतीयांचा पैसा हाच काळा पैसा असून, तो पंतप्रधान मोदींनी देशात आणावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आगामी अर्थसंकल्पात दरडोई विकास निर्देशांक हा २ टक्क्यांनी घसरलेला दिसून येईल. एफडीआय, स्टॉक एक्सचेंज आदींतून काळा पैसा हा परदेशांत गेलेला आहे. तो भारतात आणण्यात यावा. तसेच काळा पैसा हा रोखी स्वरुपात नसून मालमत्ता वा भूखंडामध्ये गुंतविलेला आहे.त्याविरोधात कुठलिही कार्यवाही होताना दिसून येत नाही. पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांची माफी मागावी आणि नोटाबंदीच्या काळात बँक वा परिसरात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.
माजी आ. जेथलिया म्हणाले, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली असून, शेतमालाचे भाव घसरले आहेत. त्यामुळे काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. तर डाळिंब असो वा कापूस शेतकऱ्यांना रोख पैसा मिळत नसल्याने तो संकटात सापडला आहे. तर व्यापारी चेकद्वारे पेमेंट करीत असून, तो वटण्यास आठ दिवस लागत आहे, असा आरोप भीमराव डोंगरे यांनी केला. (प्रतिनिधी)