'त्या' ४१९ विद्यार्थ्यांची मास कॉपी नव्हेच ! स्थगित निकाल जाहीर, नापासांना परीक्षा देता येणार
By राम शिनगारे | Published: November 9, 2023 02:14 PM2023-11-09T14:14:00+5:302023-11-09T14:17:28+5:30
संबंधित परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका, परीक्षेपासून कर्मचारी डिबार
छत्रपती संभाजीनगर : एप्रिल महिन्यात शेंद्रा येथील वाल्मिकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर मास कॉपीचा प्रकार घडला नसल्याचे चौकशीतून समोर आले आहे तसेच संबंधित विद्यार्थ्यांचा ‘व्होल परफाॅर्मन्स कॅन्सल’(डब्यूपीसी) रद्द करण्याची केलेली शिफारसही रद्दबातल ठरविण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला. ज्या उत्तरपत्रिकांमध्ये कॉपीचा प्रकार आढळला त्या विषयात संबंधित विद्यार्थ्यांवर नापासची कारवाई केली असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
शेंद्रा येथील वाल्मिकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर सायंकाळी उत्तरपत्रिका ३०० ते ५०० रुपये घेऊन देण्यात येत असल्याचा व्हीडिओ एका विद्यार्थिनीने व्हायरल केला होता. त्यामुळे ४ एप्रिल २०२३ रोजी एकच गोंधळ उडाला. या केंद्रावर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तज्ज्ञांकडून तपासून घेतल्या. या उत्तरपत्रिका संबंधितांनी निष्काळजीपणे तपासत मास कॉपी झाल्याचे लिहुन दिले. त्यानुसार हे प्रकरण तपासासाठी ४८(५) (क) समितीकडे पाठविले. त्या समितीने प्राध्यापकांच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांचा व्होल परफॉर्मन्स कॅन्सल (डब्ल्यूपीसी) ची कारवाई करण्याची शिफारस परीक्षा मंडळाकडे केली.
परीक्षा मंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनीच स्वत:च ४ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांची सुनावणी घेतली. दरम्यानच्या कालावधीत उत्तरपत्रिका तपासणाऱ्या काही प्राध्यापकांनी आम्ही निष्काळजीपणे उत्तरपत्रिका तपासल्याचे लिहुन दिले. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तज्ज्ञांकडून पुन्हा तपासणी केली. त्यात विद्यार्थ्यांकडून मास कॉपी झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. काही विषयांमध्ये कॉपी केल्याचा प्रकारही उघड झाला. मात्र, हा प्रकार मास कॉपीच्या नियमांत बसत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना संबंधित विषयात नापास करण्यात आले. मात्र, त्यांच्यावर परीक्षेसाठी घातलेली बंदीचा निर्णयही मागे घेतला आहे.
कोणत्या महाविद्यालयाचे होते विद्यार्थी
पीपल्स कॉलेज ऑफ फाॅरेन्सिक सायन्स ॲण्ड सायबर सिक्युरिटी, शेंद्रा आणि कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, शेंद्रा या दोन महाविद्यालयांतील ४१९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यात बी.एस्सी संगणक शास्त्राचे १९, बी.एस्सी आयटी ४, बीसीए मॅनेजमेंटचे १०, बीबीए ४५ आणि बी.एस्सी फाॅरेन्सिक सायन्सच्या ३४१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कर्मचारी परीक्षेपासून डिबार
संबंधित परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत केंद्रप्रमुख, सहकेंद्रप्रमुख, पर्यवेक्षकांसह परीक्षेच्या कामातील सहभागींना तीन वर्षांसाठी परीक्षेच्या कामासाठी बंदी घालण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे योग्य नाही
शेंद्रा येथील परीक्षा केंद्रात घडलेला प्रकार हा मास कॉपी नव्हता. त्या प्रकरणाची सर्व बाजूने चौकशी केली. जे विद्यार्थी थोडे फार दोषी आढळले त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई केली. त्याविषयीची संपूर्ण माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली. महाविद्यालयात जो प्रकार घडलाच नाही, त्याचा 'मीडिया ट्रायल' झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे योग्य नाही.
- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू