२ महिन्यांत निर्धन रुग्णांवर उपचार नाही; ५० टक्के धर्मादाय रुग्णालयांचा गोरगरिबांना ‘ठेंगा’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 01:25 PM2024-05-20T13:25:07+5:302024-05-20T13:25:51+5:30

१० धर्मादाय रुग्णालयांपैकी काही रुग्णालयांनी आरक्षित खाटांच्या संख्येपेक्षाही कमी रुग्णांवर उपचार केले.

Not a single poor patient treated in 2 months; 50% of charitable hospitals to be given to the poor | २ महिन्यांत निर्धन रुग्णांवर उपचार नाही; ५० टक्के धर्मादाय रुग्णालयांचा गोरगरिबांना ‘ठेंगा’

२ महिन्यांत निर्धन रुग्णांवर उपचार नाही; ५० टक्के धर्मादाय रुग्णालयांचा गोरगरिबांना ‘ठेंगा’

छत्रपती संभाजीनगर : धर्मादाय रुग्णालयांमधील प्रत्येकी १० टक्के खाटा या निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात येतात. मात्र, शहरातील ५० टक्के धर्मादाय रुग्णालयांनी दोन महिन्यांत एकाही निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णावर उपचार केले नसल्याचे उघडकीस आले. शिवाय काही धर्मादाय रुग्णालयांमध्येही संख्या दाखविण्यापुरतेच उपचार होतात.

शहरातील धर्मादाय रुग्णालयांनी दोन महिन्यांत धर्मादाय योजनेअंतर्गत किती रुग्णांवर उपचार करण्यात आले, याची माहिती अधिकारातून विचारणा करण्यात आली. तेव्हा २२ पैकी १२ रुग्णालयांमधील रुग्णसंख्या ‘निरंक’ दाखविण्यात आली. उर्वरित १० रुग्णालयांनी या योजनेत लाभ मिळालेल्या रुग्णांची संख्या दर्शविली.

आरक्षित खाटांच्या निम्म्या रुग्णांवर उपचार
१० धर्मादाय रुग्णालयांपैकी काही रुग्णालयांनी आरक्षित खाटांच्या संख्येपेक्षाही कमी रुग्णांवर उपचार केले. निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी प्रत्येकी २१ खाटा आरक्षित असताना दोन महिन्यांत अवघ्या १० रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. काही रुग्णालयांनी चांगली सेवा देत खाटांपेक्षाही अधिक रुग्णांवर उपचार केले.

मनमानी पद्धतीने बिल आकारणी
छत्रपती संभाजीनगरातील २२ धर्मादाय रुग्णालयांपैकी १२ रुग्णालयांनी दोन महिन्यांत एकाही रुग्णाला धर्मादाय (चॅरिटेबल) योजनेचा लाभ दिला नाही. माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मिळाली. रुग्णांची संख्या निरंक दाखवण्यात आली आहे. रुग्णहक्काची सनददेखील अनेक ठिकाणी लावलेली नाही. धर्मादाय रुग्णालय असूनही अनेक ठिकाणी मनमानी पद्धतीने बिल आकारले जात आहे.
- कुंदन लाटे, जिल्हा समन्वयक, रुग्ण हक्क परिषद

ऑनलाईन प्रणालीद्वारे माॅनिटरिंग
धर्मादाय रुग्णालयांसंदर्भात पोर्टल तयार केले जात आहे. ऑनलाइन प्रणालीद्वारे माॅनिटरिंग केले जाणार आहे. आचारसंहितेनंतर त्याचे उद्घाटन होईल. कुठे, किती बेड शिल्लक आहेत, हे सर्वसामान्यांना सहजपणे कळेल. काॅल सेंटरद्वारेही ही सगळी माहिती घेता येईल.
- रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष

निर्धन रुग्ण : पूर्णपणे मोफत उपचार
- उत्पन्न मर्यादा (वार्षिक १.८० लाख रुपये)
- १० टक्के राखीव बेड

दुर्बल घटकातील रुग्ण : सवलतीच्या दरात उपचार
-उत्पन्न मर्यादा (वार्षिक ३.६० लाख रुपये)
-१० टक्के राखीव बेड

आवश्यक कागदपत्रे
-शिधापत्रिका किंवा
-दारिद्र्यरेषेखालील पत्रिका किंवा
-वार्षिक उत्पन्नाचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र.

Web Title: Not a single poor patient treated in 2 months; 50% of charitable hospitals to be given to the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.