एकही दगड आदित्य ठाकरेंच्या गाडीवर फेकला गेला नाहीः औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 02:02 PM2023-02-08T14:02:12+5:302023-02-08T14:06:16+5:30
आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद कार्यक्रमात डीजे बंद करण्यावरून राडा
औरंगाबाद: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मंगळवारी शिवसंवाद कार्यक्रमासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे आले असता. डिजे बंद केल्याच्या कारणावरून वाद झाल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. मात्र, ग्रामीण पोलिसांनी याबाबत खुलासा करून दगडफेकीचा आरोप फेटाळला आहे.
ठाकरे गटाच्या युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सातव्या शिवसंवाद यात्रेनिमित्त मंगळवारी सायंकाळी नाशिक जिल्ह्यातून औरंगाबादच्या दौऱ्यावर आले. वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे त्यांचा शिवसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. कार्यक्रम स्थळापासून हाकेच्या अंतरावर रमाबाई आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रम सुरू होता. कार्यकर्ते डी.जे.लावून जयंती उत्सव साजरा करीत होते. या डि.जे.चा आदित्य यांच्या भाषणाला अडथळा येत असल्याचे पाहून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी डी.जे. बंद करायला लावला. यातून वाद झाला.यानंतर हा वाद चिघळला. हे लक्षात येताच आदित्य यांनी स्टेजवरून उतरून उपस्थितांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी शिवशक्ती, भिमशक्ती यांची युती झाली आहे. मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला डी.जे. वाजवायचा असेल तर वाजवा, असे म्हणाले. मात्र डि.जे. बंद केल्याने तेथे गदारोळ झाला. यावेळी तणाव वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कडक बंदोबस्तात आदित्य यांचा ताफा महालगावातून बाहेर काढला. यावेळी काहीजण या ताफ्यावर धावून आले. यावेळी दगडफेक झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
एकही दगड फेकला गेला नाही
याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल लांजेवार म्हणाले की, महालगाव येथील आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यावर त्यांचा ताफा निघाला असताना काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यात एक माध्यम प्रतिनिधी किरकोळ जखमी झाला आहे. परंतु यावेळी दगडफेक झाली नाही. सभेत किंवा आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात आला नसल्याचा दावाही ग्रामीण पोलिसांनी केला आहे.
काही अडचण आली असेल तर माफी मागतो
या साऱ्या प्रकारावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मी माईकवर बोललो, काही कारणास्तव साऊंड बंद झाला असेल. एकमेकांना समजून घ्यावे लागते. मी माईकवर माफीही मागितली. संविधानाच्या रक्षणासाठी शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आलीय. काही अडचण आली असेल तर माफी मागतो. पण एवढे मोठे कारण नाही. डीजे ५-१० मिनिटांसाठी बंद केला असेल. पण मी माईकवर सांगितले डिजे चालू द्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
अंबादास दानवेंचं पोलीस महासंचालकांना खरमरीत पत्र
आदित्य ठाकरे यांची शिवासंवाद यात्रा औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील महालगाव मंगळवारी होती. तेव्हा तेथील ग्राम सचिवालयासमोरील मैदानावर सभा सुरू असताना तिथे अज्ञात जमावाकडून दगड मारण्यात आला. तसेच सभा संपवून तिथून निघतानाही आदित्य ठाकरे यांच्या कारवर दगड मारण्यात आले. तसेच सभेच्या ठिकाणी हिंसक जमाव चाल करून आला. सदर प्रकरणात सुरक्षेमध्ये अक्षम्य कसूर झाली आहे. त्याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.